दिलासा देण्यास केंद्राचा नकार; हक्कभंग ठराव मांडण्याचा सेनेचा इशारा

खासदार असले म्हणून काय झाले? एखादा खासदार विमानामध्ये अशा पद्धतीने वागू शकतो, हे माझ्या कल्पनेपलीकडचे असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड shiv sena mp Ravindra Gaikwad यांच्यावर सर्व विमान कंपन्यांनी लादलेली हवाई प्रवासबंदी तूर्त उठविली जाणार नसल्याचे केंद्राने सोमवारी लोकसभेमध्ये स्पष्ट  केले. पण जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर एअर इंडियाविरुद्ध हक्कभंग ठराव मांडण्याचा आणि मुंबई विमानतळावर राडा करण्याचा गर्भित इशारा शिवसेनेने दिल्याचे समजते. एअर इंडियामध्ये कामगार संघटना शिवसेनेची आहे.

खासदारसुद्धा एक प्रवाशी आहे. विमान प्रवास करताना सर्वानाच नियम पाळावेच लागतात, कारण त्याचा थेट संबंध सुरक्षेशी असतो. नियमभंगाची परिणती दुर्घटनांमध्येही होऊ  शकते. म्हणून काही बाबतीत खासदारांनाही आम्ही विशेष वागणूक देऊ  शकत नाही, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी लोकसभेत सांगितले. पण एकंदरीत प्रा. गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेण्याबाबत सहानुभूतीने विचार करण्याचे संकेत राजू आणि नंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजनांनी दिला. विमान प्रवासबंदी घातल्यास खासदारांना संसदेत येणे मुश्कील होईल, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी  महाजन यांनी केली.

प्रश्नोत्तराचा तास संपताच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अरविंद सावंत, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने या सात खासदारांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावरील हवाईबंदी मागे घेण्याची मागणी केली. गायकवाडांच्या कृतीचे आम्ही समर्थन करीत नाही. त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाईत जे होईल ते होईल. त्याला आमची तयारी आहे. पण गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्यावर हवाई प्रवासबंदी घालण्याचा अधिकार विमान कंपन्यांना दिला कुणी? मुक्त हवाई प्रवासाचा अधिकार (राइट टू फ्लाय) आम्हाला राज्यघटनेने दिलाय. तो हिरावून घेणाऱ्या विमान कंपन्या कोण, असा सवाल अडसूळ यांनी केला. पण शिवसेनेच्या मागणीला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचे अन्य पक्षांनी, किमान लोकसभेत तरी टाळले. काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी गायकवाड यांच्यामुळे सर्व खासदारांची मान शरमेने गेल्याचे सांगितले. त्यावरून त्यांची आणि शिवसेना खासदारांची बाचाबाची झाली. आडसूळ व खैरे यांच्या पुढील बाकावरच अशोक गजपती राजू बसले होते. पण त्यांनी हवाई प्रवासाची बंदी मागे घेण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर एकही अवाक्षर काढले नाही. याउलट गायकवाडांची वर्तवणूक खासदारपदाला साजेशी नसल्याचे सांगत कान उपटले. मात्र, खासदारांनी राजू यांच्याशी चर्चा केल्याने यावर मार्ग काढण्याचे संकेत मिळाले.

शिवसेना खासदार गायब

गायकवाडांचा मुद्दा लोकसभेत जोरदारपणे मांडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता, पण सोमवारी लोकसभेत १८ पैकी फक्त सातच खासदार होते. त्यातही अरविंद सावंत शेवटच्या क्षणी धावतपळत आले. त्यामुळे मुद्दा उपस्थित करताना त्यांना फारच मर्यादा आल्या. सभागृहाने शिवसेनेची फारशी दखलच घेतली नाही. एमआयएमचे असुद्दिन औवेसी शिवसेनेच्या खासदारांना ‘टिप्स’ देत होते. राज्यसभेत तर तीनही खासदार (संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत) उपस्थित नव्हते. शेवटी काँग्रेसचे हुसेन दलवाई आणि समाजवादी पक्षाचे नरेश आगरवाल यांना शिवसेनेचा किल्ला लढवावा लागला.

चूक कोणी केली? नेमके काय घडले.. ती वेगळी बाब आहे. खासदारांना संसदेमध्ये यावे लागते. दर वेळी ते रेल्वेने इतक्या दूरवर येऊ  शकत नाहीत.. त्यांच्यासाठी विमान प्रवास गरजेचा असतो.

सुमित्रा महाजन, लोकसभा सभापती