आसाराम लोमटे

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघातले शेवटच्या टप्प्यातले चित्र अत्यंत चुरशीचे आहे. नेहमीच ही निवडणूक हरणाऱ्या राष्ट्रवादीने यावेळी कडवे आव्हान निर्माण केल्याने खासदार संजय जाधव विरुद्ध राजेश विटेकर यांच्यात राजकीय अस्तित्वासाठी सध्या चुरशीची लढत आहे.

गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. प्रत्येक वेळी हे वर्चस्व मोडून काढण्याच्या आणाभाका विरोधकांकडून घेतल्या जातात, तरीही लोकसभेवर असलेला भगवा मात्र कायम राहतो. अर्थात याला शिवसनिकांच्या तटबंदीशिवाय दोन्ही काँग्रेसमधली गटबाजी व परस्पर  हेवेदावे कारणीभूत आहेत. यावेळी गटतट विसरून दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसत असले तरीही या एकजुटीचे रूपांतर मतदानात किती परावर्तीत झाले हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. आजवरच्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला बाहेरून जी राजकीय ताकद मिळते त्यातून विजयाचा मार्ग सोपा होतो. यावेळी ही ताकद बरीच खंडित झाली आहे.

शिवसेनेचा निवडून आलेला खासदार पक्षद्रोह करतो, हा जसा या मतदारसंघातला सेनेचा इतिहास आहे तसाच राष्ट्रवादीचा इतिहास पक्षांतर्गत गटबाजीचा आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी परंपरेला छेद देण्यात आला आहे. गेल्या वेळी निवडून आलेले खासदार जाधव पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि राष्ट्रवादीमध्येसुद्धा पहिल्यांदाच एकवाक्यता दिसून  येत आहे. ही या निवडणुकीची दोन महत्त्वाची वैशिष्टय़े सांगता येतील.

लोकसभा निवडणुकीपुरता केवळ व्यासपीठावर पक्षीय विचार मांडला जातो, पण या जिल्ह्यत जिल्हा परिषदांपासून ते बाजार समित्यांपर्यंत अनेक सत्तास्थानांवर दोन्ही काँग्रेससोबत शिवसेना-भाजप यांचे संगनमत पाहायला मिळते. ३० वर्षांत शिवसेनेच्या खासदारांनी आजवर काय केले याची वस्तुनिष्ठ अशी चिकित्सा कधीच विरोधकांकडून होत नाही. दोन्ही बाजूंनी वरवरचे आरोप-प्रत्यारोप केले जातात, जे याही निवडणुकीत झाले. यावेळची निवडणूक अटीतटीची आणि शिवसेनेचीही कसोटी पाहणारी आहे.

परभणी लोकसभेवर शिवसेनेची पकड आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी सगळे पुढारी आणि नेते आहेत. मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मदानात आहे. नेते विरुद्ध कार्यकत्रे अशीही लढत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ती जिंकणार आणि पुन्हा भगवा फडकवणार.

-खासदार संजय जाधव (उमेदवार, शिवसेना)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातत्याने शिवसेनेचा खासदार जनतेने निवडून दिला, पण सेनेने मतदारसंघाच्या विकासासाठी काहीच केले नाही. यावेळी जनतेला परिवर्तन पाहिजे. शिवसेनेच्या उमेदवाराविषयी असलेल्या नाराजीचाही आम्हाला फायदा होईल. ‘खासदार बदला, जिल्हा बदलेल’ हा आमचा नारा आहे.

– राजेश विटेकर (उमेदवार, राष्ट्रवादी)