केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आलं आहे. या खातेवाटपात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळालेली नाही. शिवसेना या सगळ्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रीपद शिवसेनेला मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना नाराज आहे शिवसेनेला रेल्वे, उर्जा आणि नागरी उड्डाण या खात्यांची अपेक्षा होती. मात्र त्यापैकी एकही खातं न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे अशा चर्चा रंगल्या असतानाच संजय राऊत यांनी अशी कोणतीही नाराजी नाही हे स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला जे खातं दिलं आहे त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रीपद आलं आहे. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या वाट्याला महत्त्वाचं पद येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद दिलं गेल्याने शिवसेना नाराज आहे अशा चर्चा रंगल्या. मात्र या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नाही या चर्चा फक्त प्रसारमाध्यमं घडवून आणत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला जो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही मुळीच नाराज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खातेवाटपापूर्वी शिवसेनेला रेल्वे खातं, उद्योग, नागरी उड्डाण ही तीन खाती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तसं न होता पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला २०१४ प्रमाणेच अवजड उद्योग खातं आलं आहे. त्यामुळे सेना आणि भाजपामध्ये मानापमान नाट्य पुन्हा रंगणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आम्ही नाराज नाही असे म्हणत संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. गुरूवारी ते दिल्लीत दाखल झाले होते. आता आज ते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena is not upset with anything says sanjay raut on portfolio
First published on: 31-05-2019 at 14:54 IST