जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होत असताना संरक्षण मंत्री गोव्यात काय करत आहेत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत आणि संरक्षणमंत्री गोव्यात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे,’ अशी टीका राऊत यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोव्यात आहेत. यावेळी संजय राऊत यांनी गोव्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गोव्यातील भाजप सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार आहे. त्यामुळेच भाजपकडून निवडणूक लढण्यास कोणीही उत्सुक नाही. भाजप पैसे फेकून लोकांना विकत घेऊ शकत नाही,’ असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

‘भाजपचे काही नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरदेखील गोव्यात आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होत असताना, आपले जवान शहीद होत असताना संरक्षणमंत्री गोव्यात काय करत आहेत ? त्यांनी दिल्लीत असायला हवे. जवानांवर हल्ला होत असताना संरक्षणमंत्र्यांनी गोव्यात असणे, हे दुर्देवी आहे. गोव्यातून देश चालवता येणार नाही,’ असे म्हणत संजय राऊत यांनी पर्रिकरांवर हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत यांनी गोवा भाजप आणि मनोहर पर्रिकर यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपकडून लगचेच प्रत्युत्तर देण्यात आले. ‘मुंबई महानगरपालिकेत इतके घोटाळे होत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईत थांबायला हवे. घोटाळ्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत,’ असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्याकडून देण्यात आले. ‘संजय राऊत यांच्या बाष्कळ बडबडीला गोवातील जनता किंमत देत नाही,’ असेदेखील माधव भांडारी पुढे म्हणाले.

गोव्यात शिवसेना भाजपच्या विरोधात निवडणूक लढते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केली आहे. गोव्यातील ४० जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.