महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीच्या चर्चा रंगू लागलेल्या असतानाच काँग्रेसशिवाय बिगर भाजपा पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही याची आठवण काँग्रेसने करून दिली. याच सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजपा आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि पवार यांची त्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. मात्र या भेटीगाठींमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेट राव यांनी टाळल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं होतं. याचवर बोलताना राऊत यांनी काँग्रेसचा हात सोडणार नसल्याचे संकेत दिलेत.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी, “आम्ही कधीच काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचा उल्लेख केलेला नाही. ज्यावेळी ममता बॅनर्जींनी अशा राजकीय आघाडीबद्दल विषय काढला तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची मागणी केली. केसीआर यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं मत व्यक्त केलंय.
काँग्रेसने काय म्हटलं…
काँग्रेसशिवाय भाजपाविरोधी आघाडी आकाराला येऊ शकत नाही वा यशस्वी होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर राव यांनी संसदेत भाजपाला मदत होईल अशीच भूमिका आतापर्यंत घेतली होती. आता त्यांचे विचार बदलले आहेत. त्यांच्या भाजपाच्या विरोधात बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांचा भाजपाला सक्षम पर्याय होऊ शकत नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.
पवार यांच्याकडून थंड प्रतिसाद…
देशाच्या राजकारणातील बुजूर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राव यांच्या राजकीय खेळीला अजिबात महत्त्व दिले नाही. चंद्रशेखर राव यांचे भाजपबरोबर बिनसल्यापासून त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उभारली आहे. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच विरोधी आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे असावे, अशी चंद्रशेखर राव यांची इच्छा दिसते. मुंबई भेटीत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांचा सूर तसाच होता. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पण चंद्रशेखर राव यांच्या समक्षच शरद पवार यांनी त्यांना थंडा प्रतिसाद दिला. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत तेलंगणातील विकास मुद्दय़ांवर चर्चा झाली. फक्त विकास, विकास आणि विकास यावर चर्चा झाली. भेटीत राजकीय चर्चा फारशी झाली नाही, असे सांगत पवार यांनी राव यांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नांना फारसे महत्त्व देत नाही हेच अधोरेखित केले.