भारतीय रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झालेली पहायला मिळत आहे. रुपयाचा दर पडतो तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच सामान्य लोकांच्या खिशालाही फटका बसतो. ज्या अर्थव्यवस्थेचा विकासदर गत आणि विद्यमान दशकात बहुतेक काळ साडेसहा-सात टक्क्यांच्या आसपास किंवा वर होता, तो दर सरत्या आर्थिक तिमाहीमध्ये तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच पाच टक्क्यांपर्यंत घसरला. अनेक क्षेत्रांना मंदीची झळ पोहोचत आहे. वाहननिर्मिती व गृहबांधणी या क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती जवळपास थांबली असून, उलट शेकडोंवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. यावरून सोशल मीडियावरही बरीच टीका होत आहे. तर उपरोधिक विनोद, मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो शेअर करत प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण होतेय,’ असा फोटो निर्मला सीतारामन यांच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झाला. हाच फोटो शेअर करत शोभा डे यांनी ‘मला हे आवडलंय,’ असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी निर्मला यांच्यासोबतच केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनासुद्धा टॅग केलं आहे. गोयल यांना टॅग करण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी गेल्या आठवड्यात केलेलं विचित्र विधान.

”आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी गणिताचा उपयोग कधीही झाला नसता,” असे विधान गोयल यांनी गुरुवारी केले होते. यावर त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर गोयल यांनी सीएसएमटी येथील कार्यक्रमात आपली चूक मान्य केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shobhaa de tweet nirmala sitharaman indian rupee ssv
First published on: 16-09-2019 at 13:59 IST