काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी शाखेच्या केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ताफ्यावर चप्पल फेक केली. हा ताफा पेरुंबवूरहून कोठामंगलम येथे जात होता. दरम्यान, या नंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचं वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. तसंच, या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
कुरुप्पमपाडी पोलिसांनी सांगितलं की, आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, आंदोलकांनी बस किंवा कार्यक्रमांवर अशी कृत्ये केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. नवा केरळ सदस कार्यक्रमातून जनतेचा मोठा सहभाग दिसत आहे. त्यांच्या प्रतिसादातून कार्यक्रमाची गरज असल्याचं स्पष्ट होतंय. आमच्या मार्गावर शेकडो लोक जमतात. त्यांच्यातील एक माणूस काळा झेंडा दाखवत असतो. परंतु, ही माणसं अशीच एकटी असतात.
“आज आम्ही आमच्या मार्गावरून प्रवास करत होतो तेव्हा आम्हाला एक वेगळा अनुभव आला. याआधी आंदोलकांनी आमच्या वाहनांवर हल्ला केला होता. आता तर त्यांनी आमच्या बसवर काहीतरी फेकलं”, असंही ते म्हणाले.
आमदार एल्डोज कुन्नापिल्ली यांनी आरोप केला की वामपंथी विद्यार्थ्यांची संस्था डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. काँग्रेसच्या जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करत असातना त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, राजकीय अभियानांनासाठी प्रशासनाचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.