Sexual Assault : कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच महिलांवर, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनाही समोर येत आहेत. बदलापूरमध्ये १३ ऑगस्टला दोन शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचेही तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या दुकानादाराने सहा जणांचा लैंगिक छळ ( Sexual Assault ) केल्याची घटना प्रकाशात आली आहे.
नेमकी घटना काय?
किराणा मालाचं दुकान चालवणारा दुकानदार अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण ( Sexual Assault ) करायचा. त्याचा व्हिडीओ तयार करुन नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. या किराणा माल दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या FIR मध्ये सहा पीडितांची नावं आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या मेरठची आहे.
मुलांना शीतपेयातून गुंगीचं औषध द्यायचा किराणा दुकानदार
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या प्रकरणातला आरोपी हा किराणा दुकान चालवतो. तो तिथे येणाऱ्या मुलांना टार्गेट करायचा. दुकानात लहान मुलं आली की त्यांना शीतपेयं प्यायला द्यायचा. ते पिऊन त्यांना गुंगी आली की त्यांचा लैंगिक छळ ( Sexual Assault ) करुन त्यांच्यावर अत्याचार ( Sexual Assault ) करायचा. या अत्याचाराचं व्हिडीओ शुटींग करुन या मुलांना ब्लॅकमेल करायचा. त्यांच्याकडून पैसे उकळायचा. या प्रकरणी सहा जणांनी तक्रार केली आहे.
पीडित मुलांनी सांगितली आपबिती
एका पीडित मुलाने सांगितलं की, मी त्या माणसाच्या दुकानात काहीतरी सामान आणायला गेलो होतो. त्यानंतर त्या काकांनी कोल्ड ड्रींक प्यायला दिली. ते प्यायल्यानंतर मला गुंगी आली. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या काकांनी माझा व्हिडीओ दाखवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसंच पैसे घेऊन ये नाहीतर तुझा व्हिडीओ व्हायरल करेन असं त्यांनी सांगितलं. मी याबाबत माझ्या आईला एक महिन्याने सांगितलं. याच प्रकरणात अडकलेल्या आणखी एका मुलाच्या कुटुंबाने सांगितलं की आमच्या मुलाने कोल्ड ड्रींक पिणं सोडलं आहे आणि खाणंही सोडलं आहे तसंच बोलणंही सोडलं आहे. त्याच्या मनावर त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांचा खूप गहिरा परिणाम झाला आहे.
या प्रकरणाने मेरठ हादरलं आहे. याच प्रकरणातल्या एका पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितलं आहे की किराणा दुकानदाराने जे कृत्य माझ्या मुलासह केलं त्यानंतर त्याने बोलणंच सोडलं आहे. काही दिवसांपूर्वी आमचा मुलगा ३ हजार रुपये घेऊन गेला होता. हे त्याने त्या माणसाला दिले हे आम्हाला कळतं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने FIR नोंदवली आहे. तसंच कैलाश सत्यार्थी फाऊंडेशन तर्फे या मुलांना मदत केली जाते आणि त्यांचं समुपदेशन करण्यात येतं आहे. FIR मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.