वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आफताब पूनवाला या प्रियकराने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आहे. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत जंगलात फेकून दिले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे. अशा घटनांना सुशिक्षित मुलीच जबाबदार असल्याचं कौशल किशोर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर न्यूज १८ शी संवाद साधत होते. श्रद्धा खून प्रकरणाबाबत बोलताना कौशल किशोर म्हणाले की, “ज्या आई-वडिलांनी आपल्याला संभाळलं, त्यांना एका झटक्यात मुली सोडून जातात. आई-वडिल विरोध करत असतील, तर कोर्टात जाऊन लग्न करा. मात्र, मुली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये का राहतात? ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणाऱ्यांची नोंदणी केली पाहिजे.”

हेही वाचा : संतापजनक! श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास; नंतर जेवण मागवले, बिअर प्यायला अन्…

“स्वत: निर्णय घेण्यास सक्षम आहे, असं म्हणणाऱ्या सुशिक्षित मुलींबरोबर या घटना घडत आहे. त्याच अशा घटनांना जबाबदार आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे लग्न न करता नवरा-बायकोसारखे एकत्र राहणे. यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. याचेच परिणाम लोकांना भोगावे लागत आहे,” असेही कौशल्य किशोर यांनी म्हटलं आहे.