जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दुपारपर्यंत केवळ १ टक्का मतदान झाले आहे. एकूण ३८ मतदान केंद्रावर मतदान होत आहे परंतु अद्यापही मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. रविवारी झालेल्या हिंसाचारामुळे काही ठिकाणी पुन्हा मतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. काश्मीरमधील बुडगाम या भागात मतदानादरम्यान सर्वाधिक हिंसाचार झाला.
३४,१६९ अधिकृत मतदात्यांपैकी केवळ ३४४ मतदारांना सकाळपासून हजेरी लावली. श्रीनगर या मतदारसंघासाठी हे मतदान होत आहे. बुडगाम आणि खानसाहिब या विधानसभा मतदारसंघातून तर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तर चरार ए शरीफ या भागातून केवळ दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. रविवारी हिंसाचारामुळे केवळ ७ टक्केच मतदान झाले. चादुरा या भागात सर्वाधिक हिंसाचार पाहायला मिळाला होता. या भागात आज २०० जणांनी मतदान केले आहे. बीरवाह या भागातून १४२ जणांनी मतदान केले आहे.
रविवारी मतदानादरम्यान झालेल्या संघर्षामध्ये आठ जण मृत्यूमुखी पडले. काही भागात स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली होती. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ८ जण मृत्यूमुखी पडले होते. ३८ मतदान केंद्रावर पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी १२.६१ लाख मतदात्यांपैकी केवळ ७.१४ टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ९ जण उभे आहेत. नॅशनल काँफरंस पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीपल डेमोक्रेटिक पक्षाचे नाजीर अहमद खान हे रिंगणात आहेत. १५ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. पीडीपी नेते तारिक हमीद यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.