Poison in School Drinking Water: शाळेच्या मुस्लीम प्राध्यापकांना पदावरून हटवण्यासाठी पाचवीच्या एका मुलाकरवी शाळेच्या टाकीत विषारी द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातला हा प्रकार असून पोलिसांनी यात श्रीराम सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. १४ जुलै रोजी हा प्रकार घडला असून त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत शाळेतले १२ विद्यार्थी आजारी पडले आहेत. सागर पाटील, नागनागौडा पाटील व कृष्णा मदार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?

एनडीटीव्हीनं पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुलेमान गोरीनाईक हे गेल्या १३ वर्षांपासून बेळगावातील हुलीकट्टी परिसरातल्या सरकारी शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांच्यावर असलेल्या रागातून त्यांची त्या पदावरून बदली करण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी शाळेतील पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य मिसळण्याचा निंदनीय प्रकार घडला. या प्रकारामुळे १२ विद्यार्थी आजारी पडले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्याचा केला वापर

दरम्यान, हे कृत्य करण्यासाठी आरोपींनी एका पाचवीच्या विद्यार्थ्याचा वापर केल्याची बाब उघड झाली आहे. या विद्यार्थ्यानं पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य मिसळल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याकडे विचारणा केली असता सगळा प्रकार स्पष्ट झाला. पाण्याच्या टाकीत ते द्रव्य मिसळण्यासाठी आपल्याला सांगितलं गेलं होतं, असं या विद्यार्थ्याने सांगितलं. असं करायला सांगणाऱ्याचं नाव कृष्णा मदार असल्याचंही एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे.

कृष्णावर दबाव, श्रीराम सेनेशी कनेक्शन

दरम्यान, या प्रकरणाचा शेवटी संबंध थेट श्री राम सेनेपर्यंत गेला. संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानेच हे सगळं घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. कृष्णा मदारला सागर पाटील व नागनगौडा पाटील हे त्याचं आंतरजातीय प्रेमप्रकरण उघड करण्याची धमकी देत होते. त्यावरून ब्लॅकमेल करून या दोघांनी कृष्णाकडून हे कृत्य करवून घेतलं.

सागर पाटील हा श्री राम सेनेचा स्थानिक तालुका पातळीवरचा अध्यक्ष आहे. त्याच्यासह पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सागर पाटीलने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

धार्मिक द्वेषातून झालेले क्रूर कृत्य – सिद्धरामय्या

“या शाळेचे मुख्याध्यापक मुस्लीम आहेत. त्यांची इतरत्र बदली व्हावी या हेतूने सागर पाटीलने इतर दोघांच्या मदतीने शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य मिसळण्याचा गुन्हा केला. त्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. हे पाणी प्यायल्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले, पण सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. धार्मिक कट्टरतावाद आणि जातीय द्वेषातून हीन कृत्य घडू शकतात. कदाचित अनेक निरपराध मुलांचा बळी घेऊ शकणारं हे कृत्यदेखील त्याच प्रकारचं आहे”, असं सिद्धरामय्या यांनी सोशल पोस्टच्या माध्यमातून नमूद केलं आहे.