Shruti Chaturvedi Racial Profiling at US Airport : भारतातील तरुण उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांनी दावा केला आहे की अमेरिकेतील एफबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना अलास्काच्या विमानतळावर आठ तास थांबवून ठेवलं, तिथल्या पुरुष अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. या सगळ्यात त्यांचं विमानही सुटलं. त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून आपली आपबिती मांडली आहे. चतुर्वेदी यांनी त्यांची तपासणी करण्याचं कारणही सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या पर्समध्ये एक पॉवरबँक होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांना त्या पॉवरबँकबद्दल संशय आला आणि त्यांनी मला बाजूला बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांनी माझी तपासणी केली.

“अलास्काच्या अँकोरेज विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माझ्याकडील पॉवरबँकमुळे संशय व्यक्त केला आणि त्यानंतर आठ तास मला थांबवून ठेवलं”, असं श्रुती चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “पुरुष अधिकाऱ्यांनी माझी तपासणी केली. मला आठ तास थांबवून ठेवलं आणि या आठ तासांत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी देखील दिली नाही.”

श्रुती चतुर्वेदींनी सांगितली अमेरिकन विमानतळावरील आपबिती

चायपानी नावाची पब्लिक रिलेशन फर्म चालवणाऱ्या श्रुती चतुर्वेदी यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “जरा कल्पना करा की पोलीस आणि एफबीआयने तुम्हाला आठ तास त्यांच्या ताब्यात ठेवलं आहे. तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंबद्दल चौकशी केली जात आहे, हास्यास्पद प्रश्न विचारले जात आहेत, कॅमेऱ्यासमोर पुरुष अधिकारी तुमची तपासणी करतोय, तुमच्याकडील गरम कपडे, मोबाइल फोन, पर्स, बटवा त्यांनी ताब्यात घेतला आहे. तुम्हाला एका थंड खोलीत डांबून ठेवलंय, तुम्हाला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही, एखादा फोन कॉल करण्याची परवानगी दिली जात नाही, तुमचं विमान सुटलं आहे आणि तुम्ही चिंतेत आहात. हे सगळं का होतंय? तर तुमच्या हँडबॅगमधील पॉवरबँकवर समोरच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रुती चतुर्वेदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग केलं आहे. चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे की “मला या गोष्टीची कल्पना करण्याची गरज नाही, कारण आठ तास मी त्याच खोलीत होते.” श्रुती चतुर्वेदी या इंडियन अ‍ॅक्शन प्रोजेक्ट अँड डिजीटल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म चायपानीच्या संस्थापक आहेत.