पीटीआय, नवी दिल्ली
अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. कॅलिफोर्निया किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांना सात दिवसांसाठी आरोग्य पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात येणार आहे.
‘ॲक्सिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेंतर्गत शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेले आहेत. हे चार अंतराळवीर सोमवार, १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३५ वाजता आयएसएसवरून निघणार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजता ते कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची अपेक्षा आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी फ्लाइट सर्जनच्या देखरेखीखाली पुनर्वसन कार्यक्रम सात दिवसांसाठी करावा लागणार आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले.
इस्रोने शुक्लाच्या ‘आयएसएस’च्या प्रवासासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च केले आहे. हा अनुभव २०२७ मध्ये ‘गगनयान’ या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये अंतराळ संस्थेला मदत करेल, अशी अपेक्षा इस्रोने व्यक्त केली.