कर्नाटकमध्ये आज नव्या सरकारची स्थापना झाली आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती. गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता. दरम्यान, आज (२० मे) बंगळुरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

दरम्यान, या शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप अशा काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

सिद्धरामय्या, शिवकुमार आणि खर्गे यांच्याव्यतिरिक्त के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज आणि एम. बी. पाटील या तीन नेत्यांनी नव-निर्वाचित कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पाटील हे कर्नाटकमधील लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या तिन्ही मंत्र्यांना शपथ दिली.

हे ही वाचा >> “…आता दोन हजारांची नोट बंद, याला काय अर्थ?” मोदी सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच काँग्रेस आमदार जी. परमेश्वर यांनीदेखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यानंतर तिसरी शपथ परमेश्वर यांनीच घेतली. त्यांना महत्त्वाचं खातं दिलं जाईल असं बोललं जात आहे. परमेश्वर हे मुख्यंत्रीपदाच्या शर्यतीत देखील होते.