‘लोकल सर्कल्स’ संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष

नवी दिल्ली : भारतातील करोनाप्रतिबंधक लसीकरणात आतापर्यंत कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा जास्त वापर करण्यात आला असून त्यांचे सहपरिणाम सौम्य तरी होते किंवा अनेकांमध्ये असे परिणाम दिसून आले नाहीत. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन यांच्या दोन मात्रा घेतलेल्यांमध्येही असे परिणाम आढळून आले नाहीत.

देशात १६  जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व सीरम इन्स्टिटय़ूटऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या लशींचा वापर प्रामुख्याने करण्यात आला. लसीकरणाच्या सह दुष्परिणामांबाबत ‘लोकल सर्कल्स’ या संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले, की कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्या ७० टक्के व कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ६४ टक्के लोकांमध्ये एकतर किरकोळ परिणाम दिसून आले किंवा दुष्परिणाम झालेच नाहीत. कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेतलेल्या ७५ टक्के लोकांमध्ये तर कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या ७८ टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम जाणवले नाहीत किंवा ते किरकोळ स्वरूपाचे होते.

कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ३० टक्के व्यक्तीत काही दुष्परिणाम आढळून आले, त्यात २९ टक्के जणांना ताप आला तर १ टक्के लोकांना  कोविडचा संसर्ग झाला. कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या ३० टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम काही प्रमाणात जाणवले, त्यात १ टक्के लोकांत तापापेक्षा गंभीर परिणाम होते पण कुणाला संसर्ग झाला नाही.

कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेतलेल्यात २० टक्के जणांना ताप आला तर ४ टक्के लोकांना कोविड संसर्ग झाला तसेच १ टक्के लोकांमध्ये तापापेक्षा गंभीर परिणाम दिसले.

कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १७ टक्के जणांमध्ये ताप तर २ टक्के लोकांमध्ये कोविड संसर्ग दिसून  आला, तीन टक्के व्यक्तीत तापापेक्षा गंभीर परिणाम दिसले. एकूण ४० हजार जणांची पाहणी यात करण्यात आली, त्यात ३८१ जिल्ह्य़ांचा समावेश होता. ६२ टक्के प्रतिसादक हे पुरूष तर २८ टक्के महिला होत्या.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ३७,५९३ जणांना करोनाचा संसर्ग झाला, तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ होऊन ती ३,२२,३२७ वर पोहचली. करोनाबाधितांची एकूण संख्या ३,२५,१२,३६६ इतकी झाली असून, याच कालावधीत ६४८ जण करोनाला बळी पडल्यामुळे करोनामृत्यूंचा आकडा वाढून ४,३५,७५८ इतका झाला आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या ०.९९ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३,१७,५४,२८१ इतकी असून, हे प्रमाण ९७.६७ टक्के इतके आहे.

शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण

नवी दिल्ली : चालू महिन्यात राज्यांना कोविड लशींच्या २ कोटी अतिरिक्त मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शिक्षकांचे शिक्षक दिनापूर्वी (५ सप्टेंबर) अग्रक्रमाने लसीकरण करावे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख  मंडावीया यांनी म्हटले आहे.  पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो त्या निमित्ताने त्यांनी एका ट्विट संदेशात म्हटले आहे, की राज्यांना लशींच्या दोन कोटी मात्रा दिल्या आहेत. राज्यांनी सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे व त्यासाठी या लसमात्रांचा वापर करावा.