या आठवड्यात मंगळवारी युकेमधील बर्मिंगहॅमजवळील ओल्डबरी येथे दोन श्वेतवर्णीय पुरूषांनी एका २० वर्षीय ब्रिटिश वंशाच्या शीख महिलेवर हल्ला करत बलात्कार केला. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून ते पुढील तपास करत आहेत. पीडितेच्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी आरोपींनी वांशिक शिवीगाळ केल्याचाही दावा केला गेला.

शीख फेडरेशनने (युके) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अत्याचार करत असताना ‘तुम्ही या देशातील नाहीत. इथून चालते व्हा’, अशी टिप्पणी केली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पीडितेवर हल्ल्याची झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली.

ज्याठिकाणी पीडितेवर अत्याचार झाला तिथून काही मिनिटांच्या अंतरावर खासदर गुरिंदर सिंग जोसन यांचे घर आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, हा एक भयानक असा हल्ला आहे. पीडितेप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो. पोलीस गुन्हेगारांना लवकरच शोधतील. ही एक द्वेषपूर्ण घटना आहे.

वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांचे स्केचेस प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी एक पुरूष ३० वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. त्याचे डोक्यावरचे केस भादरलेले आहेत. त्याने राखाडी रंगाचा झिप-अप हुडी, काळा ट्रॅकसूट, काळे हातमोजे घातले आहेत. दुसऱ्या संशयिताचे तपशीलवार वर्णन मिळू शकलेले नाही. परंतु स्थानिकांना पुढे येऊन याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.

विदेशात भारतीय नागरिक लक्ष्य

दरम्यान विदेशात भारतीय नागरिकांवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही काळापासून अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने भारतीय नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. १५ ऑगस्ट रोजी वोल्व्हरहॅम्प्टन स्थानकाबाहेर सतनाम सिंग (६४) आणि जसबीर संघा (७२) या दोन ब्रिटिश शीख टॅक्सी चालकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सिंग याची पगडी फाडण्यात आली. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलीस याला वांशिकदृष्ट्या गंभीर हल्ला मानत आहेत.

टेक्सासमध्ये भारतीय कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

अमेरिकेमध्ये टेक्सास येथे भारतीय वंशाच्या हॉटेलच्या व्यवस्थापकाचा त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच शिरच्छेद करण्यात आला. वॉशिंग मशीनवरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली. आरोपी योर्दानिस कोबो-मार्टिनेझ याला अटक करण्यात आली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रा मौली नगमाल्ले असे खून झालेल्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे.