2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर भव्य सेलिब्रेशन करण्यात आलेल्या दिल्लीतील भाजपा मुख्यालयाबाहेर आज मात्र वेगळं चित्र दिसत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. यामुळेच नेहमी विजय साजरा करण्यासाठी सज्ज असणाऱ्या दिल्ली मुख्यालयाबाहेर आज शुकशुकाट पहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरव्ही देशभरातल्या कार्यकर्त्यांची गर्दी असणाऱ्या दिल्ली मुख्यालयाबाहेर आज मात्र कोणीही दिसत नाही आहे. 2019 च्या निवडणुकीआधी भाजपासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे. हिवाळी अधिवेशनासाठी संसदेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निवडणुकीच्या निकालावर बोलणं टाळलं होतं. यावरुन भाजपात चिंतेंचं वातावरण असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात आघाडी घेतलेला काँग्रेस पक्ष सध्या मागे पडला असून पुन्हा एकदा भाजपाने आघाडी घेतली आहे. सध्या मध्य प्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदी कोण याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे चर्चेत आहे. तर यासंदर्भातील निर्णय राहुल गांधीच घेतील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silence outside bjp headquarter in delhi
First published on: 11-12-2018 at 11:56 IST