केंद्रात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आल्यापासून (२०१४) कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचा तडाखा बसलेल्या २५ प्रमुख राजकारण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांत काँग्रेसचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार, तृणमूल काँग्रेसचे तीन; तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)चे दोन; तर समाजवादी पक्ष आणि वायएसआर काँग्रेस पार्टीच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे. यापैकी २३ जणांच्या राजकीय कृतीमुळे (भाजपमध्ये प्रवेश) त्यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या संशोधनातून निदर्शनास आले.

२३ पैकी तीन प्रकरणे बंद करण्यात आली आहेत, तर अन्य २० प्रकरणांची चौकशी थांबवण्यात तरी आली किंवा ती थंड बस्त्यात ठेवण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्यांच्या यादीतील सहा राजकीय नेते यावर्षी म्हणजे सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपमध्ये सामील झाले.

सन २०१४ नंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता येताच ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेले ९५ टक्के प्रमुख राजकीय नेते विरोधी पक्षांचे होते, हे इंडियन एक्स्प्रेसने २०२२मध्येच शोध अभ्यासातून उघड केले होते.

भ्रष्टाचारातील कथित आरोपींनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत नाही, हे वारंवार निदर्शनास आल्याने विरोधी पक्षांनी भाजपला ‘धुलाई यंत्र’ अशी उपमा दिली आहे.

महाराष्ट्रात सन २०२२ आणि २०२३मध्ये जी राजकीय उलथापालथ झाली ती केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र असल्यामुळे, असे अलिकडील निष्कर्ष असे दर्शवतात.

काही प्रमुख उदाहरणे

हिमंता बिस्व सरमा

(सध्या आसामचे मुख्यमंत्री, मूळ पक्ष काँग्रेस</strong>, २०१५मध्ये भाजपप्रवेश)

● गैरव्यवहार प्रकरण : शारदा चीट फंड गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सुदिप्ता सेन यांच्याशी आर्थिक व्यवहार. गोव्यातील पाणी प्रकल्पाच्या लाच प्रकरणाशी संबंधित लुईझ बर्गर प्रकरणातही नाव.

घटनाक्रम

ऑगस्ट २०१४: निवास्थानी सीबीआयचे छापे.

नोव्हेंबर २०१४: सीबीआयकडून चौकशी

ऑगस्ट २०१५ : भाजपमध्ये प्रवेश

प्रकरणाची सद्यास्थिती: प्रकरण बंद केलेले नाही, पण कारवाईही नाही.

हेही वाचा >>>वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन

रणिंदर सिंग

(सन २०२१मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री (काँग्रेस) अमरिंदर सिंग यांचे पुत्र)

● गैरव्यवहार प्रकरण :

परकीय चलनाबाबतच्या ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन.

घटनाक्रम :

नोव्हेंबर २०२० : ईडीकडन चौकशी

नोव्हेंबर २०२१ : वडील अमरिंदर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी.

सप्टेंबर २०२२ : अमरिंदर यांचा भाजपमध्ये प्रवेश.

प्रकरणाची सद्या:स्थिती : प्रकरणाच्या तपासात काहीच प्रगती नाही.

प्रफुल्ल पटेल

(राष्ट्रवादीत फूट पडल्यावर भाजपशी हातमिळवणी )

● प्रकरण काय आहे ?

यूपीए सरकारमध्ये हवाई वाहतूकमंत्री असताना एअर इंडिया आणि इंडियन एअर लाइन्सने १११ विमाने खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. एअर इंडियाचे फायद्यातील मार्ग परदेशी विमान कंपन्यांना बहाल केल्याचा आरोप होता. विदेशी गुंतवणुकीतून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश नव्हता.

घटनाक्रम :

मे २०१७ : एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरणात गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

मे २०१९ : ईडीकडून पटेल यांचा आरोपपत्रात उल्लेख

जुलै २०२३ : राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाजपशी हातमिळवणी

मार्च २०२४ : सीबीआयकडून प्रकरण बंद करण्यासाठी अर्ज

सद्यास्थिती : न्यायालयात अर्ज प्रलंबित

हेही वाचा >>>‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

प्रताप सरनाईक,आमदार

(एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी)

घोटाळ्याचे प्रकरण बंद

● प्रकरण काय आहे ?

सरनाईक यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार व पैशांचा अपहार केल्याचा आरोप. ‘एनएसईएल’मधील घाोटाळ्यात सरनाईक यांच्या भूमिकेबद्दल ईडीकडून चौकशी. ईडीकडून त्यांचे निवासस्थान व आस्थापनांवर छापे. ईडीकडून चौकशी. ईडीकडून होणारा त्रास टाळण्यासाठीच भाजपबरोबर जुळवून घेण्याचे पत्र आमदार सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

घटनाक्रम :

नोव्हेंबर २०२० : ईडीकडून निवासस्थान व कार्यालयांवर छापे

जून २०२१ : ईडीकडून सुटका होण्यासाठी भाजपबरोबर पुन्हा युती करण्याचे ठाकरे यांना पत्र

जून २०२२ : एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी. भाजपबरोबर हातमिळवणी.

सप्टेंबर २०२२ : प्रकरण बंद करण्यासाठी ईडीचा अर्ज न्यायालयाने मान्य केला.

सद्यास्थिती : पुढे काहीच कारवाई नाही. दुसऱ्या घोटाळ्यात चौकशी सुरू.

● प्रकरण थंड बस्त्यात असलेले घोटाळेबाज नेते पुढीलप्रमाणे :

अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री (काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश)

● प्रकरण काय आहे ?

‘आदर्श’ घोटाळा. मुख्यमंत्रीपदी असताना संरक्षण खात्याच्या भूखंडावर आदर्श इमारत बांधण्यास परवानगी देण्याच्या बदल्यात सदनिका घेतल्याचा आरोप. नियम डावलून इमारतीला परवानगी. सीबीआयकडून गुन्हा दाखल आणि ईडीकडून चौकशी.

नोव्हेंबर २०११ : आदर्श घोटाळा उघडकीस

नोव्हेंबर २०११ : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

डिसेंबर २०११ : सीबीआयकडून गुन्हा दाखल

जुलै २०१२ : सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

२०१४ ते २०२४ : आदर्श घोटाळ्याची टांगती तलवार

फेब्रुवारी २०२४ : भाजपमध्ये प्रवेश व खासदारकी

सद्यास्थिती : प्रकरण न्यायप्रविष्ठ

छगन भुजबळ

अन्न व नागरी पुरवठामंत्री (राष्ट्रवादी अजित पवार गट)

● प्रकरण काय आहे ?

महाराष्ट्र सदन घोटाळा. १०० कोटींचे काम देण्यात घोटाळा झाल्याचा लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि ईडीचा आरोप. मार्च २०१६ मध्ये भुजबळांना ईडीकडून अटक. दोन वर्षे तुरुंगात काढल्यावर मे २०१८ मध्ये जामीन मंजूर, जामीन मिळाल्यावर परदेशात प्रवास. ईडीचा आधी आक्षेप नंतर अर्ज मागे घेतला.

घटनाक्रम :

२०१५ : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

मार्च २०१६ : ईडीकडून अटक

मे २०१८ : न्यायालयाकडून जामीन मंजूर

मार्च २०२१ : विशेष न्यायालयाचा दिलासा.

जुलै २०२३ : अजित पवार गटात दाखल, भाजपबरोबर हातमिळवणी

नोव्हेंबर २०२३ : प्रकरण फारच संथगतीने पुढे सरकत असल्याची न्यायालयाची टिप्पणी

सद्यास्थिती : खटला सुरू

हसन मियालाल मुश्रीफ

वैद्याकीय शिक्षणमंत्री (राष्ट्रवादी अजित पवार गट)

● प्रकरण काय आहे ?

कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सुमारे ४० हजार शेतकऱ्यांकड़ून भागभांडवलासाठी रक्कम गोळा केली. शेतकऱ्यांना शेअर प्रमाणपत्र न देता ही सारी रक्कम मुश्रीफ यांनी कुटुंबीया आणि नातेवाईकांच्या विविध शेल कंपन्यांमध्ये पैसे वळविल्याचा ईडीचा आरोप.

घटनाक्रम :

मार्च २०२३ : ईडीकडून तीन वेळा मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे, अटक होणार अशी तेव्हा चर्चा

जुलै २०२३ : मुश्रीफ अजित पवार गटात, भाजपबरोबर हातमिळवणी.

सद्यास्थिती : चौकशी सुरू पण प्रकरण थंडबस्त्यात.

भावना गवळी

खासदार (शिवसेना शिंदे गट)

● प्रकरण काय आहे ?

भावना गवळी विश्वस्त अललेल्या न्यायास घोटाळा. १७ कोटींचा गफला केल्याचा आरोप. सहकारी सईद खान याच्या नावे असलेली ३.७५ कोटींची सदनिका ईडीकडून जप्त

घटनाक्रम :

ऑगस्ट २०२१ : ईडीकडून संस्थेशी संबंधित मालमत्तांवर छापे

सप्टेंबर २०२१ : सहकाऱ्याला ईडीकडून अटक

नोव्हेंबर २०२१ : ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

जून २०२२ : एकनाथ शिंदे गटात दाखल, भाजपशी हातमिळवणी

सद्यास्थिती : प्रकरण थंडबस्त्यात

कृपाशंकर सिंह

(काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश)

● प्रकरण काय आहे ?

बेहिशेबी मालमत्ता जमी केल्याचा आरोप. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत ९५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड,. यापैकी १८ कोटींची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे निष्पन्न.

घटनाक्रम :

फेब्रुवारी २०१२ : सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल. ईडीकडून चौकशी

एप्रिल २०१५ : आरोपपत्र दाखल

फेब्रुवारी २०१८ : तांत्रिक बाबींवर सुटका, राज्यात भाजपचे सरकार असतानाही कृपाशंकर सिंह यांना दिलासा

सप्टेंबर २०१९ : काँग्रेसचा राजीनामा

जुलै २०२१ : भाजपमध्ये प्रवेश

मार्च २०२४ : भाजपकडून उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी

सद्यास्थिती : थंडबस्त्यात

यशवंत जाधव

(शिवसेना शिंदे गट)

माजी स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका

● प्रकरण काय आहे ?

स्थायी समितीचे अध्यक्ष असताना बेहिशेबी मालमत्ता जमा केली. तसेच विदेशात गुंतवणूक करू न फेमा कायद्याचे उल्लंघन. ४० पेक्षा अधिक मालमत्तांवर जप्ती . ईडीकडून चौकशी.

घटनाक्रम :

फेब्रुवारी २०२२ : प्राप्तिकर विभागाकडून छापे

मे २०२२ : ईडीकडून चौकशी. तेव्हा अटकेची शक्यता वर्तविली जात होती.

जून २०२२ : शिंदे गटात सहभागी

सद्यास्थिती : प्रकरण थंडबस्त्यात .

बाबा सिद्दिकी

(काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात समावेश)

● प्रकरण काय आहे ?

वांद्रे भागातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील गैरव्यवहारात नाव. या प्रकरणात गुंतलेल्या विकासकाची ४५० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

घटनाक्रम :

मे २०१७ : ईडीकडून छापे

फेब्रुुवारी २०२४ : अजित पवार गटात समावेश

सद्या:स्थिती : चौकशी सुरू

नवीन जिंदल मूळचे काँग्रेसचे, हरियाणातील उद्याोगपती, कोळसा प्रकरणातील आरोपी

● गैरव्यवहार प्रकरण : कोळसा खाणींचे वितरण

घटनाक्रम जून २०१३ : कोळसा खाण गैरव्यवहाप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल. सन २०१६, २०१७ : आरोपपत्र दाखल एप्रिल २०२२ : एका नव्या प्रकरणात ईडीचे छापे. मार्च २०२४ : भाजपमध्ये प्रवेश प्रकरणाची सद्या:स्थिती : ईडीमार्फत चौकशी सुरू.

सुवेंदू अधिकारी (सध्या पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते)

● गैरव्यवहार प्रकरण : नारदा स्टिंग ऑपरेशन. तृणमूल काँग्रेसच्या ११ नेत्यांसह आरोपी. ● घटनाक्रम एप्रिल २०१७ : नारदा स्टिंग प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल. एप्रिल २०१९ : लोकसभेचे खासदार असल्यामुळे कायदेशीर कारवाईसाठी सीबीआयकडून लोकसभा अध्यक्षांना परवानगीची विनंती. डिसेंबर २०२० : भाजपमध्ये प्रवेश प्रकरणाची सद्या:स्थिती : लोकसभा अध्यक्षांसाठी अद्याप प्रलंबित.