मानवी मनाचा ठाव अद्याप कुणालाही लागलेला नाही असं म्हणतात. पण असं असलं तरी तसं करण्याचे प्रयत्न मात्र अविरतपणे चालूच असतात. अशाच एका प्रयत्नाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आलेला एक निष्कर्ष सध्या चर्चेत आहे. या निष्कर्षानुसार, एकट्या राहणाऱ्या पुरुषांपेक्षा एकट्या राहणाऱ्या महिला या अधिक सुखी, आनंदी, समाधानी असतात. या निष्कर्षांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेकजण यावर आपापली मतं मांडताना दिसत आहेत.

‘सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स’मध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला असून हिंदुस्तान टाईम्सनं त्याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. सेज जर्नल्स पब्लिकेशनमध्येही हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. एलेन होआन आणि जेफ मॅकडोनाल्ड यांनी हे संशोधन केलं आहे. त्यांच्यामते आयुष्याच्या सर्वच भागांमध्ये एकट्या राहणाऱ्या महिला या एकट्या राहणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त समाधानी व आनंदी असतात. आत्तापर्यंत प्रामुख्याने दाम्पत्यांच्या मानसिकतेवरच संशोधन झालेलं असताना एकट्याने राहणाऱ्या व्यक्तींवर झालेलं हे संशोधन दुर्मिळ असल्याचं मानलं जातं. रिलेशनशिप स्टेटस सिंगल ठेवण्याचं वाढतं प्रमाण या प्रकारच्या व्यक्तींच्या अभ्यासासाठी प्रेरक ठरल्याचंही या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.

कसा करण्यात आला अभ्यास?

या संशोधनासाठी २०२० ते २०२३ या काळातील १० वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनांसाठी करण्यात आलेल्या अभ्यासाच्या आधारे माहिती घेऊन हा शोधनिबंध तयार करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी ५९४१ प्रयुक्तांनी (संशोधनातील सहभागी व्यक्ती) सहभाग घेतला होता. हे प्रयुक्त अभ्यास केला त्यावेळी ‘सिंगल’ होते. यात समान संख्येनं पुरुष आणि महिला होत्या. या सहभागी व्यक्तींचं वय साधारण १८ वर्षे ते ७५ वर्षे यादरम्यान होतं. त्यांचं सरासरी वय ३१.७ वर्षे इतकं होतं.

प्रश्नावली आणि दिलेली उत्तरे!

या सर्व व्यक्तींन देण्यात आलेल्या प्रश्नावलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होता. त्यामध्ये त्यांचं रिलेशनशिप स्टेटस, सामान्यपणे जीवनमानाचा दर्जा, त्यातलं समाधान, लैंगिक सुख, जोडीदाराविषयीच्या अपेक्षा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. यातून आलेल्या उत्तरांचा सांख्यिक पद्धतीने अभ्यास करून त्यावर आधारित निष्कर्ष काढण्यात आले.

‘अफेअरप्रूफ’ वैवाहिक आयुष्य?!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यासातून काय आले निष्कर्ष?

या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, एकट्याने राहणाऱ्या महिला सर्वसाधारणपणे त्यांच्या नात्याबाबतच्या सद्यस्थितीबाबत, जीवनविषयक समाधानाबाबत, लैंगिक सुखाबाबत आणि जोडीदार असण्याबाबतच्या अत्यल्प अपेक्षांबाबत जास्त समाधानी होत्या.