Viral News : देशभरात अनेक वेगवेगळ्या घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर जीवनाची कोणतीही हमी नसते, ते आपल्याला कधी दगा देईल हे सांगणं कठीण असतं. काही क्षणांपूर्वी आपण ज्या व्यक्तीशी बोललो किंवा सकाळी भेटलेली व्यक्ती संध्याकाळपर्यंत या जगाचा निरोप घेऊ शकते. कोण कधी सोडून जाईल याची शाश्वती नसते. अशाच प्रकारची वस्तुस्थिती सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं घटना काय घडली?
एका व्यक्तीने त्याच्या बॉसकडे आजारी असल्यामुळे सुट्टीची विनंती करणारा मेसेज पाठवला. सर आजारी असल्यामुळे एक दिवसाची सुट्टी हवी होती, अशा प्रकारे सुट्टीची मागणी करणारा मेसेज पाठवल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच त्या ४० वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातील पोस्ट केव्ही अय्यर नामक एक्स अंकाउटवरून (ट्विटर) शेअर करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, केव्ही अय्यर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये ही घटना शेअर करत म्हटलं की, “माझ्या एक सहकारी शंकरने सकाळी ८:३७ वाजता मला मेसेज केला. ‘सर, पाठदुखीच्या तीव्र वेदनांमुळे मी आज येऊ शकत नाही. कृपया मला रजा द्या’, असा मेसेज केला. त्या मेसेजला मी उत्तर दिले की, ‘ठीक आहे, विश्रांती घ्या.’ त्यानंतर दिवस नेहमीसारखाच गेला. मात्र, त्यानंतर ११ वाजता मला एक फोन आला आणि मला धक्का बसला. फोन करणाऱ्याने सांगितलं की शंकरचं निधन झालं. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही, म्हणून मी दुसऱ्या सहकाऱ्याशी संपर्क साधून त्याचा पत्ता मिळवला. मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा तो तिथे नव्हता”, असं अय्यर यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
DEVASTATING INCIDENT WHICH HAPPENED TODAY MORNING :-
— KV Iyyer – BHARAT ???? (@BanCheneProduct) September 13, 2025
One of my colleague, Shankar texted me today morning at 8.37 am with a message
"Sir, due to heavy backpain I am unable to come today. So please grant me leave." Such type of leave requests, being usual, I replied "Ok take…
“तो सहा वर्षे माझ्या टीमचा भाग होता. तो फक्त ४० वर्षांचा, निरोगी आणि तंदुरुस्त होता. लग्न झालेलं, एक मूलही त्याला आहे, कधीही धूम्रपान किंवा मद्यपान तो करायचा नाही. पण शंकरला हृदयविकाराचा झटका आला. अविश्वसनीय म्हणजे त्याने सकाळी ८:३७ वाजता सुट्टीचा संदेश पाठवला आणि सकाळी ८:४७ वाजता त्याचं निधन झालं”, असं अय्यर यांनी पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान, या घटनेवरून अय्यर यांनी एक मेसेज देताना म्हटलं की, आयुष्य अप्रत्याशित आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी दयाळूपणे वागा आणि आनंदाने जगा, कारण पुढचा क्षण काय असेल हे तुम्हाला कधीच कळत नाही”, असंही अय्यर यांनी म्हटलं.