नवी दिल्ली : ‘बिहारमधील मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम मतदारांची पडताळणी करण्याबद्दल कमी आणि लोकशाही नष्ट करण्याबद्दल अधिक आहे’, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी केला. रमेश यांनी यासाठी निवडणूक आयोगाच्या २०२४ च्या बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांच्या सर्वेक्षणाचा दाखला दिला.
जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर एक माध्यम अहवाल प्रसिद्ध केला. त्यात दावा केला आहे की, निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारांची पडताळणी करण्यासाठी ‘एसआयआर’ मोहीम सुरू केली, परंतु मतदारांच्या महितीवरील त्यांच्या स्वतःच्या ‘२०२४ केएपी’ (ज्ञान, दृष्टिकोन आणि पद्धती) सर्वेक्षणात बिहारमधील मतदार यादी जवळजवळ अचूक असल्याचे आढळून आले, जी मतदार यादी प्रणालीची मजबुती दर्शवते.
अनेक नागरिकांनी मतदार ओळखपत्रामधील गुंतागुंतीबद्दल आयोगाचे लक्ष वेधले, परंतु निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. जानेवारी २०२५ मध्ये बिहारमध्ये ‘एसआयआर’ मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे असे निवडणूक आयोगाला वाटले नाही, परंतु त्यानंतर असे काय बदलले? असा प्रश्नही रमेश यांनी केला.