Jyoti Malhotra स्कॉटलँडच्या एका कंटेट क्रिएटरचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये भारतातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात गेल्याचं दिसतं आहे. यावेळी AK 47 बंदुका घेतलेले काही सुरक्षा रक्षक तिच्यासह दिसत आहेत. त्यामुळे आता ज्योती बाबत नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराची गोपनीय माहिती कळवल्याचा आरोप ज्योतीवर आहे.

काय आहे या स्कॉटिश व्लॉगरच्या व्हिडीओत?

एक स्कॉटिश व्लॉगर पाकिस्तानात येऊन व्हिडीओ करत होता. त्यावेळी त्याच्या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्रा सहा ते सात बंदुकधारी लोकांसह दिसत आहेत. हे सगळे पाकिस्तानचे सुरक्षा रक्षक आहेत असं सांगण्यात आलं. मात्र या सगळ्यांच्या हाती AK 47 बंदुका आहेत. तसंच सगळेजण सेमी फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांनी जी जॅकेट घातलेली दिसत आहेत त्यावर नो फिअर असं लिहिलेलं दिसतं आहे. बंदुकधारी लोक या भारतीय व्लॉगरच्या बाजूला का? असाही प्रश्न हा स्कॉटिश व्लॉगर विचारताना दिसतो आहे. आता मुख्य प्रश्न हा निर्माण होतो आहे की ज्योती मल्होत्राला इतकी सुरक्षा का पुरवण्यात आली? ती फक्त व्लॉगरच होती की आणखी काही अजेंडा पाकिस्तानला राबवायचा होता. लवकरच यातली माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दानिशच्या सांगण्यावरुन दोनदा पाकिस्तानचा दौरा

ज्योतीने तिच्या जबाबात म्हटलं आहे की मी ट्रॅव्हल विथ जो नावाने युट्यूब चॅनल चालवते. माझ्याकडे पासपोर्ट आहे. मी २०२३ मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालय दिल्ली या ठिकाणी गेले होते. पाकिस्तानचा व्हिसा मला मिळाला त्यानंतर मी पाकिस्तानला गेले. दिल्लीत दानिश या अधिकाऱ्याची आणि माझी भेट झाली. त्यानंतर माझा त्याच्याशी संपर्क वाढला. दानिशने सांगितल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार दोनदा पाकिस्तानला गेले होते. मी तिथे अली हसनला भेटले. अली हसनने पाकिस्तानात माझी राहण्याची आणि फिरण्याची सगळी व्यवस्था केली होती. आता हे बंदुकधारीही दानिशच्या सांगण्यावरुन ज्योतीबरोबर होते का? हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

Jyoti Malhotra News
ज्योती मल्होत्राच्या चौकशीत काय काय समोर आलं? (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

ज्योती मल्होत्रा ही एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. आलिशान आणि चैनीचं आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाली.

वडिलांसह एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमवण्याची खूप घाई झाली होती. त्यामुळे तिने शिक्षण झाल्यावर तातडीने नोकरी शोधण्यास सुरुवात केली.

शिक्षण झाल्यानंतर तिने सुरुवातीला म्हणजेच १४ वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्युटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. मात्र ती नोकरी तिने सोडली.

सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर एका शाळेत आणि नंतर पुन्हा एका कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मात्र अनेक नोकऱ्या तिने गेल्या काही वर्षांत बदलल्या आणि साधारण दोन वर्षांपूर्वी तिने तिचं युट्यूब चॅनल सुरु केलं होतं.