पीटीआय, बंगळूरु

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले अशी माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी शनिवारी दिली. भारताने जमिनीवरून हवेत केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मारा असल्याचेही हवाई दलप्रमुखांनी स्पष्ट केले. या मोहिमेदरम्यान, भारताने अलीकडेच खरेदी केलेली ‘एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणा’ निर्णायक ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

बंगळूरु येथे सोळाव्या ‘एअर चीफ मार्शल एल एम कात्रे स्मृती व्याख्यानमाले’ एअर चीफ मार्शल सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हवाई दलाच्या कामगिरीवर भाष्य केले. भारताने पाकिस्तानच्या भूभागात ३०० किलोमीटर अंतरावरून हे हल्ले केले गेले होते. या मोहिमेत भारतीय हद्दीत पाकिस्तानची मानवरहित विमाने (यूएव्ही), ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे पाडण्यातही भारताला यश आले असे हवाई दलप्रमुखांनी सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान केले होते. त्याविषयी बोलताना एअर चीफ मार्शल सिंह यांनी सांगितले की, विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हवाई तळ आणि जिथे नियोजन केले जाते त्या मुख्य इमारतीला लक्ष्य करण्यात आले.

आम्ही ‘एडब्ल्यूसी हँगर’मधील किमान एक ‘हवाई इशारा आणि नियंत्रण प्रणाली’ (एडब्ल्यूसीएस) आणि काही ‘एफ-१६’ विमाने पाडली. किमान पाच लढाऊ विमाने पाडली आहेत आणि एक मोठे विमान पाडले आहे. हा हल्ला आम्ही ३०० किलोमीटर अंतरावरून केला. हा खरे तर आतापर्यंत नोंदवलेला, सर्वात मोठा जमिनीवरून हवेत केलेला मारा आहे. – एअर चीफ मार्शल ए. के. सिंह, हवाई दलप्रमुख

कारवाईची वैशिष्ट्ये

– मुरीद आणि चकाला ही किमान दोन आदेश आणि नियंत्रण केंद्रे उद्ध्वस्त करण्यात यश

– पाकिस्तानचे लहानमोठे किमान सहा रडार नष्ट करण्यात यश

– तीन ‘हँगर’वर (विमान ठेवण्याची आणि देखभालीची जागा) हल्ला; ‘सुक्कुर यूएव्ही हँगर’, ‘भोलारी हँगर’ आणि ‘जेकबाबाद एफ-१६ हँगर’

– राजकीय इच्छाशक्ती होती, स्पष्ट निर्देश होते आणि कोणतेही निर्बंध नव्हते.