जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण आणि भिंवडी या तीन लोकसभा मतदार संघांमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून त्यांनी जिल्ह्य़ातील ६ हजार ७१५ मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची काळजी घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारच्या पत्रकार परिषदेत दिली.

मतदान केंद्रांवर १३ हजार ४५० बॅलेट युनिट, ८ हजार ३३ कंट्रोल युनिट, ८ हजार ७०० व्हीव्हीपॅट यंत्रांची सुविधा पुरविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १२६२ बसगाडय़ा, १३७० जीप,  ३० टेम्पो, ४५ ट्रॅक आणि २६५ कार-रिक्षा अशी एकूण २९७२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्य़ातील ६६३५ दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हील चेअर, डोली तसेच मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी रिक्षा तसेच बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीकरिता जिल्ह्य़ात १२ उपआयुक्त, १ साहाय्यक अधीक्षक, २५ पोलीस उपअधीक्षकांसह १४ हजार ३७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ात ६२ लाख २५ हजार १९४ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३१ लाख १९ हजार ८५०, महिला मतदारांची संख्या ३१ लाख ४ हजार ८९८, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ४४६ इतकी आहे. जिल्ह्य़ात ६ हजार ७१५ मतदान केंद्रे  आहेत. त्यापैकी १८ सखी मतदान केंद्रे असून त्या ठिकाणी केवळ महिला अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतील.

मुंबईतील १२ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांकडे

सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्य़ातील १२ मतदान केंद्रे महिलांच्या हाती सोपवण्यात येणार आहेत. तेथील संपूर्ण कार्यभार सर्व महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्य़ात ‘३० मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१ मुंबई दक्षिण’ हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे १० सखी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. येथे एक केंद्रप्रमुख, तीन किंवा चार निवडणूक कर्मचारी, एक पोलीस शिपाई यांचा समावेश असेल. मुंबई शहर जिल्ह्य़ातील १० विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई उपनगरातील २ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी महिलांकडे आहे.