केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात दोन महिलांचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका जोडप्यानं झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी हे दोन खून केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी जोडप्यासह त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. मुख्य आरोपी भगवंत सिंग आणि त्याची पत्नी लैला आणि साथीदार रशीद उर्फ मोहम्मद शफी असं अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तर रोझलिन आणि पद्मा असं नरबळी देण्यात आलेल्या दोन मृत महिलांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोझलिन आणि पद्मा या दोन्ही महिला केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील रहिवाशी होत्या. रोझलिन या जूनमध्ये तर पद्मा सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्या होत्या. मृतांच्या नातेवाईकांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही मृत महिलांचं शेवटचं मोबाइल लोकशन आरोपी साथीदार रशीद उर्फ मोहम्मद शफी यांच्या घरी आढळलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी भगवंत सिंग आणि त्याची पत्नी लैला यांनाही अटक केली आहे. आरोपी शफी यानेच दोन्ही महिलांचं अपहरण करून त्यांना मारेकरी जोडप्याच्या घरी घेऊन गेला होता. आरोपी भगवंत मान आणि त्याची पत्नी लैला यांनी आपल्यामागील आर्थिक चणचण कमी व्हावी आणि झटपट श्रीमंत व्हावं, या हव्यासापोटी दोघींचा खून केला आहे. आरोपींनी सुरुवातीला दोघींचे गळे चिरले आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून पथनमथिट्टा जिल्ह्यातील तिरुवल्ला गावात वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. आरोपींनी विधीवत पद्धतीने नरबळी दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा- ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेनं मृत जोडीदाराची १९ कोटींची संपत्ती हडपली, लग्न झालं नव्हतं तरीही…
मुख्य आरोपी आणि मसाज थेरपिस्ट भगवंत सिंग आणि त्याची पत्नी लैला यांना विश्वास होता की, संबंधित महिलांचा नरबळी दिल्याने त्यांच्या जीवनातील पैशांची समस्या संपेल आणि समृद्धी येईल. याच कारणातून दोन्ही महिलांचा नरबळी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तिसरा आरोपी रशीद याने या गुन्ह्यात मुख्य आरोपी जोडप्याला मदत केली आहे. त्याने एर्नाकुलम येथून या दोन महिलांचे अपहरण करून जोडप्याच्या घरी आणलं होतं. आरोपी साथीदार रशीद उर्फ मोहम्मद शफी याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.