गोळीबाराचे ‘दिशादर्शक’ स्मार्टफोन!

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे गोळीबार नेमका कुठल्या दिशेकडून होत आहे हे ओळखणारे स्मार्टफोन सॉफ्टवेअर व हार्डवेअर संशोधकांनी तयार केले आहे, यात आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचा नकाशाच स्मार्टफोनच्या स्क्रीनवर येतो.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे गोळीबार नेमका कुठल्या दिशेकडून होत आहे हे ओळखणारे स्मार्टफोन सॉफ्टवेअर  व हार्डवेअर संशोधकांनी तयार केले आहे, यात आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचा नकाशाच स्मार्टफोनच्या स्क्रीनवर येतो.
व्हँडरबील्ट युनिव्हर्सिटीच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड सिस्टीम्स’ या संस्थेच्या संशोधकांनी तयार केलेल्या स्मार्टफोन मोडय़ुलचा खर्चही फारसा नाही.
यात तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन हा साध्या शूटर लोकेशन सिस्टीममध्ये रूपांतरित होतो. कमी शक्तिशाली बंदुकांनी जर गोळीबार केला जात असेल, तर त्याच्या ध्वनिलहरी या विशिष्ट गुणधर्माच्या असतात. त्याला सॉनिक सिग्नेचर असे म्हणतात. त्यांच्या मदतीने गोळीबार नेमका कुठून होतो आहे हे ओळखता येते.
जेव्हा रायफलमधून गोळी झाडली जाते, तेव्हा एक छोटासा स्फोट (मझल ब्लास्ट) जाणवतो व ध्वनीचा फुगा (बलून) विस्तारला जातो व पसरत जातो. दुसरे म्हणजे जेव्हा गोळी सुपरसॉनिक वेगाने प्रवास करते, तेव्हा विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होत असतात. त्याचा परिणाम म्हणून संवेदनशील मायक्रोफोन, अचूक घडय़ाळ व मायक्रोप्रोसेसर यांच्या मदतीने या ध्वनिलहरीचे गुणधर्म ओळखता येतात व त्यांच्या मदतीने गोळीबार कुठल्या दिशेकडून झाला हे सर्वाधिक अचूकतेने सांगता येऊ शकते.
गोळीबारकर्त्यांचे स्थान ओळखण्यासाठी यात अनेक नोड्स असतात व त्यामुळे सुरक्षा संस्थांना त्यांचा वापर जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. या प्रकारच्या स्मार्टफोन यंत्रणेचे दोन प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात एका आवृत्तीत एका मॉडय़ुलसाठी एक मायक्रोफोन वापरलेला असतो व त्यात पहिला छोटासा स्फोट व ध्वनिलहरी यांचा वापर केलेला असतो. एकूण यात सहा मॉडय़ुल्स असतात व त्यामुळे गोळीबार कुठून होतो आहे हे अचूकपणे कळते. दुसऱ्या आवृत्तीत चार मायक्रोफोन असलेले मोठे मॉडय़ुल असतात व त्यात केवळ ध्वनिलहरींचे गुणधर्म विचारात घेतले जातात. केवळ दोन मॉडय़ुलच्या मदतीनेही गोळीबार कुठून होतो आहे हे समजू शकते पण त्यात फारशी अचूकता नसते. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी वाढत्या गोळीबाराने चिंतेचे वातावरण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smart phone will direct the shoot out