दिल्लीहून विशाखापट्टणमसाठी उड्डाण केलेले इंडिगो कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर निघू लागल्याने या विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात यावेळी १७० प्रवासी होते. या घटनेमध्ये कुठलेही नुकसान झाले नसले तरी धूर कशामुळे येत होता हे अद्याप समजू शकलेले नाही. बुधवारी उड्डाण केलेल्या विमानात हा प्रकार घडला होता.

या घटनेसाठी इंडिगोकडून इमर्जन्सी घोषित करण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून ती घोषित करण्यात आली होती. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर ही इमर्जन्सी मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानातील प्रवाशांना संध्याकाळी ४.१५ वाजता दुसरे विमान उपलब्ध करुन देण्यात आले.

या प्रकारानंतर इंडिगो आज पुन्हा एकदा चर्चेत आली. वाराणसी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध प्रवाशाचा विमानात प्रवासादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत्यू झालेला प्रवासी एकटाच विमानाने प्रवास करीत होता.

विमानांमध्ये यापूर्वीही अशा घडल्या आहेत. मार्च २०१७ मध्ये १५ प्रवाशांना मुंबईहून भुवनेश्वरला घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये धूर निघू लागल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. हे विमान पुन्हा वळवून मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले होते.