Smriti Irani माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजकारणात कमबॅकचे संकेत दिले आहेत. मला पक्षाने सांगितलं तर २०२६ मध्येही ही पुन्हा येऊ शकते त्यासाठी २०२९ ची वाट पाहण्याची आवश्यकता नाही असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. स्मृती इराणी यांना भाजपातील फायरब्रांड नेत्या असं म्हटलं जातं. त्यांनी अमेठीतून २०१९ ला राहुल गांधींचा पराभव केला होता. दरम्यान २०२४ लाही स्मृती इराणी याच मतदारसंघातून लढल्या. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता त्या क्यूँ की साँस भी कभी बहु थी या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातून पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात परतल्या आहेत. दरम्यान स्मृती इराणी यांनी कमबॅकबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
४९ व्या वर्षी कुणी निवृत्ती घेतं का?
४९ व्या वर्षी कोण रिटायर्ड होतं? ४९ व्या वर्षी तर अनेकांचं करिअर सुरुही होत नाही असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजकारणात कमबॅकचे संकेत दिले आहेत. मी तेव्हाही राजकारण केलं जेव्हा युपीएचं सरकार होतं. अखिलेश यादवांचं सरकार होतं तेव्हाही मी अमेठीत काम केलं आहे. तसंच अमेठीतून मी अशा वेळी लढले आहे जेव्हा यूपीएचं सरकार होतं. मौत के कुएँ में जाकर सिधा छलांग मारना अशीच ती स्थिती होती. २०२९ कशाला? २०२६ ला देखील पक्ष मला आदेश देऊ शकतो. मी तो ऐकेनच असं स्मृती इराणी म्हणाल्या.
आजोबांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव-स्मृती इराणी
माझ्या आजोबांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. माझे आजोबा संघ स्वयंसेवक होते. मी भाजपात आले कारण मला धोरणात्मक गोष्टी करायच्या होत्या. तसंच त्यांनी जुन्या घरातल्या आठवणीही जागवल्या. माझ्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. माझ्या मुलीला तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलंत आणि देशाची सेवा करण्याची संधी दिलीत त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो असं ते मोदींना म्हणाले होते अशीही आठवण स्मृती इराणींनी सांगितली.
मी युपीएची सत्ता असतानाही राजकारणात होतेच की
स्मृती इराणी म्हणाल्या मी १० वर्षे युपीएची सत्ता असतानाही राजकारण केलं आहे. त्यावेळी मी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचे. माझे त्यावेळचे अनेक फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. मी आंदोलन केलंय, तुरुंगवासही भोगला आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
अमेठी बाबत काय म्हणाल्या स्मृती इराणी?
अमेठीतून २०२४ मध्ये स्मृती इराणी निवडणूक हरल्या. त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या, “अमेठीची जागा जिंकून येण्यासारखी जागा कधीच नव्हती हे तुम्ही त्या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर लक्षात येईलच. अमेठीतून अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. शरद यादव इथूनच हरले. मनेका गांधी तर गांधी कुटुंबातल्या होत्या तरीही त्यांचा पराभव झाला. गांधी कुटुंबाने अमेठी निवडलं होतं कारण त्या ठिकाणी राजकीय समीकरणच असं होतं तिथे फक्त गांधी घराण्यालाच मतं मिळतील. कुठलाही समजदार राजकारणी अशी जागा कधीच निवडत नाही जिथे त्याचा पराभव निश्चित होईल. मला ती जागा दिली गेली होती. मी तिथे २०१९ मध्ये राहुल गांधींचा पराभव केला. यावेळी म्हणजेच २०२४ ला ही जर समोर राहुल गांधी असते तर मी त्यांचा पराभव केला असता. त्यांनाही याची खात्री होती. त्यामुळे ते अमेठीतून लढले नाहीत.” असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे.