Elvish Yadav : लोकप्रिय युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी युट्यूबर एल्विश यादवच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तो रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून त्यात सापांच्या विषाचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याच्यासह इतर काही जणांना अटकही झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाली होती.
दरम्यान, आता युट्यूबर एल्विश यादवला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एल्विश यादवविरुद्धच्या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे एल्विश यादवला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. आज (६ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या संदर्भातील वृत्त द हिंदूने दिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एल्विश यादवच्या विरोधात रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपाप्रकरणी ट्रायल कोर्टात कार्यवाही सुरू होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टात सुरू असलेल्या या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. तसेच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यूपी पोलिसांना नोटीसही बजावली आहे. एल्विश यादवने त्याच्यावरील आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यावर झालेल्या सुनावणीनंतर त्याला दिलासा मिळाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबर महिन्यात नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुडींना अटक केली होती. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले होते. या आरोपींनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात एल्विशला अटक झाली होती.