असहिष्णुतेविरोधात आमिर खानने केलेल्या वक्तव्यांची झळ बसलेल्या ‘स्नॅपडील’ या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीने आमिरचे वक्तव्य वैयक्तिक असून त्या वक्तव्याशी कंपनीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत वादातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.
या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर असलेल्या आमिरच्या वक्तव्यानंतर शेकडो भारतीयांनी या कंपनीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
या कंपनीचे मोबाइल अ‍ॅप काढून टाकले आहे. त्यावर स्नॅपडील ही तरुण भारतीय उद्योजकांनी सुरू केलेली कंपनी असून डिजिटल भारताचे स्वप्न साकारण्यास कटिबद्ध असल्याचे निवेदन कंपनीने जारी केले आहे. व्यवसायातील प्रतिस्पर्धी असणाऱ्या ‘फ्लिपकार्ट’ने या प्रकरणी ‘स्नॅपडील’ची पाठराखण केली आहे. तर, अनेक जणांनी ट्विटरवरून स्नॅपडीलला पाठिंबा दर्शविणारी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

आमिरच्या कुटुंबियांवर ८१७ रुपयांचे कर्ज
हरदोई : बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या कुटुंबियांवर जमिन भाडे म्हणून ८१७.९५ रुपयांचे कर्ज आहे. आमिर खानच्या कुटुंबियांचे वडिलोपार्जित घर आणि जमीन येथे आहे. स्थानिक प्रशासनाने आमिर खानला ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
शहाबादचे उपविभागीय दंडाधिकारी अशोक शुक्ला यांनी आमिरला दंड जमा करण्यास सांगितले आहे. आमिरचे अखतियारपूर गावात जुने घर असून दरवर्षी या घराची भाडेपट्टी जमा करण्यात येते. गेल्या सप्टेंबरपासून ही रक्कम शिल्लक आहे. आमिरवर ११८.२० रुपये, त्याची बहीण निखात हिच्यावर ६०६ रुपये तर इतर कुटुंबियांवर मिळून ८१७.९५ रुपये शिल्लक असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.