नवी दिल्ली : ‘लवकरच कोणीतरी आपल्या रॉकेटमधून, आपल्या मातीतून अंतराळात प्रवास करेल’, असा विश्वास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) मोहीम यशस्वी करणारे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी व्यक्त केला. ‘आयएसएस’ मोहिमेतील प्रत्यक्ष अनुभव हा मूल्यवान होता आणि कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा खूपच चांगला होता, असे ग्रुप कॅप्टन शुक्ला आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये त्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर भारत ‘सारे जहाँ से अच्छा’, असे म्हटले होते. हाच धागा पकडत ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ (संपूर्ण जगापेक्षा चांगला) दिसतो, असे सांगितले. ‘आयएसएस’ मोहिमेतील अनुभव भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, असे अॅक्सिअम-४ मोहिमेबद्दल सांगताना शुक्ला म्हणाले.
‘तुम्ही कितीही प्रशिक्षण घेतले असले तरी, जेव्हा तुम्ही रॉकेटमध्ये बसता आणि इंजिन सुरू होऊन, आग प्रज्वलित होते, तेव्हा तो क्षण अद्भुत असतो. मी या क्षणाची कल्पनाही केली नव्हती. मी सुरुवातीचे काही सेकंद रॉकेटच्या मागे धावत होतो आणि मला ते पकडण्यासाठी थोडा वेळ लागला. त्या क्षणापासून आम्ही खाली येईपर्यंतचा अनुभव अविश्वसनीय होता. तो इतका रोमांचक आणि आश्चर्यकारक होता की, तो शब्दांत कथन करणे अवघड आहे’, असे ते म्हणाले.