Son Killed Mother : आईला भूतबाधा झाली आहे मी उपाय करतो असं म्हणत एका मुलाने त्याच्याच आईला मारहाण करत तिची हत्या केली. ही घटना कर्नाटकमधल्या शिवमोगा या ठिकाणी घडली आहे. मृत महिलेवर कथित रुपाने आत्म्याची सावली होती असं या मुलाचं म्हणणं होतं. केवळ अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा संतोष आणि आशा नावाची एक महिला या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय नावाच्या एका माणसाने त्याची आई गीतम्माला भुताने झपाटलं आहे हे त्याने सांगितलं. त्यानंतर तो एका महिलेकडे त्याच्या आईला घेऊन गेला. तिथे गीतम्माला इतकी मारहाण करण्यात आली की तिचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. ज्यानंतर आम्ही संजयला अटक केली असं पोलिसांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी काय घटना घडली?
आरोपी संजयने त्याच्या आईमध्ये असलेली कथित भूतबाधा काढण्यासाठी एका महिलेकडे घेऊन गेला. महिलेने आणि संतोषने गीतम्माला इतकी जबरदस्त मारहाण केली की तिचा या मारहाणीत मृत्यू झाला. तिच्या या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गीतम्माच्या डोक्यावर लिंबं ठेवून तिला लाकडाने बडवण्यात आलं. सोमवारी रात्री ९.३० ते १ वाजेपर्यंत कथित भूत उतरवण्याचा हा सगळा अघोरी प्रकार चालला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आशा नावाची महिला आणि संतोष या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?
व्हायरल व्हिडीओत दिसत असलेल्या दृश्यांमध्ये गीतम्मा केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत बसलेली दिसते आहे. तर आशा आणि संतोष या महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. आधी लिंबू तिला हुंगायला देत आहेत आणि ते लिंबू तिच्या डोक्यावर ठेवून मारहाण करत आहेत असंही या व्हिडीओत दिसून येतं आहे. सगळ्यात आधी तिला थपडा मारण्यात आल्या. त्यानंतर जेव्हा गीतम्मा खाली पडली तेव्हा संतोष आणि आशा हे दोघंही तिला लाकडी दांडक्याने मारत आहेत असं या व्हिडीओत दिसतं आहे.
बिहारमध्येही अशीच घटना
काही दिवसांपूर्वी बिहारमधल्या पूर्णियामध्येही अशीच घटना घडली. एक महिलेवर ती चेटकीण असल्याचा आरोप करत ५० ते ६० जणांच्या जमावाने तिला मारहाण केली आणि तिला ठार मारलं. सोनू कुमार नावाच्या मुलाने सांगितलं की त्याची आई सीता देवीला पाच जणांनी मारलं. त्यानंतर डिझेल टाकून जिवंत जाळलं. त्यावेळी तिथे ५० ते ६० जण होते. त्यांनीही या सगळ्यात सहभाग घेतला होता. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटना सध्या घडताना दिसून येत आहेत.