Sonam Raghuvanshi : मधुचंद्राला गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे दोघेही बेपत्ता झाले ही बातमी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आली होती. त्यांची शोध मोहीम सुरु होती. मात्र २ जून रोजी राजाचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर ८ जून रोजी जेव्हा सोनम पोलिसांना शरण आली तेव्हा सोनमनेच सुपारी किलर्सच्या मदतीने राजाची हत्या घडवून आणल्याचं पोलिसांना सांगितलं. या कटात तिचा प्रियकर राज कुशवाहाही सहभागी होता.

मेघालय पोलिसांना मिळाला सोनमचा लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने

मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांना आता सोनमचा लॅपटॉप आणि तिने बरोबर घेतलेले दागिने मिळाले आहेत. राजा रघुवंशीच्या गळ्यात हनिमूनला गेलेला असताना जी सोन्याची साखळी होती ती सोनमने काढून घेतली होती. ती सोनसाखळी विशेष तपास पथकाने जप्त केली आहे. तसंच सोनम रघुवंशीचा लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रं पोलिसांना सापडली आहे. सिलोम जेम्सच्या घरावर जेव्हा पोलिसांनी छापा मारला तेव्हा त्यांना ही कागदपत्रं आणि इतर पुरावे सापडले आहेत.

राज कुशवाहाला अटक केल्यानंतर सोनम आली शरण

इस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सैय्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी राजा रघुवंशीची सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी सुपारी किलर्सकडून हत्या घडवून आणली. राजाचा मृतदेह २ जून रोजी पोलिसांना आढळून आला. मात्र सोनम रघुवंशी तरीही बेपत्ता होती. सुरुवातीला पोलिसांना हे लूट आणि अपहरण याचं प्रकरण वाटलं होतं. मात्र पोलिसांनी जेव्हा सोनम रघुवंशीचे फोन रेकॉर्ड तपासले तेव्हा राज कुशवाहाशी ती सातत्याने संपर्कात होती हे कळलं. पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. त्यानंतर ८ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली.

२३ मे च्या दिवशी नेमकं काय घडलं?

२३ मे रोजी राजा आणि सोनम हे दोघंही शिपारा होम स्टे या ठिकाणी आले. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी या दोघांनी चेक इन केलं. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास राजा आणि सोनम हे दोघंही ट्रेकला जाण्यासाठी तयार झाले. याचवेळी सोनमने ज्या तिघांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती ते तिघेही जवळच्या एका होम स्टेमध्ये राहिले होते. साधारण १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजाने ट्रेक करत असताना २ हजार पायऱ्यांचं अंतर पार केलं. त्याआधी त्यांची भेट आनंद, आकाश आणि विशाल यांच्याशी झाली होती. साधारण १० वाजण्याच्या सुमारास राजा, सोनम, आकाश, विशाल आणि आनंद या पाचही जणांना अल्बर्ट या टुरिस्ट गाईडने पाहिलं होतं. अल्बर्टने दिलेल्या जबाबामुळेच सोनमच यामागे असावी हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाची चक्रं फिरवली. या टुरिस्ट गाईने दिलेल्या माहितीनुसार सोनम या चार जणांच्या मागून चालत होती तर तिच्या चालण्याचा वेग थोडा मंदावला होता.

राजाची हत्या सोनमने केलेल्या इशाऱ्यानंतरच

दुपारी १२.३० च्या दरम्यान सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला. मी खूपच दमले आहे आणि उपास ठेवला आहे असं तिने सासूला म्हणजेच राजाच्या आईला सांगिलं. त्यावेळी उमा रघुवंशी राजाशीही बोलल्या. राजाशी हा आपला शेवटचा संवाद आहे हे तेव्हा त्यांना मुळीच वाटलं नव्हतं. साधारण आणखी अर्ध्या तासाने दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हे पाचही जण मावलखियाट या ठिकाणाहून वेई सावदोंग धबधब्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी सोनलने या तिघांना इशारा केला ज्यानंतर राजाच्या डोक्यावर चाकू हल्ला करण्यात आला. राजाची हत्या करण्यात आली तेव्हा सोनम तिथेच उपस्थित होती. राजाच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या मोबाइलवरुन सात जन्मो का साथ असं लिहून एक सोशल मीडिया पोस्ट केली. दुपारी २.३० च्या दरम्यान राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. असा घटनाक्रम राजाच्या मृत्यू आधी घडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.