Sonam Wangchuk’s wife writes to President : कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतींना लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या आणि पतीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना समजून घेण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांच्या पतीच्या सुटकेची मागणी देखील केली आहे.

त्यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनादेखील पाठवले आहे. या पत्रात अंगमो यांनी सोनम वांगचुक यांची ‘बिनशर्त सुटका’ करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी वांगचुक हे हवामान बदल आणि मागास आदिवासी भागाच्या विकासासाठी आंदोलन करणारे ‘शांतताप्रिय गांधीवादी आंदोलक’ असल्याचे म्हटले आहे.

लडाखला सहाव्या परिशिष्टाअंतर्गत संरक्षण आणि राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान वांगचुक यांच्या पत्नी अंगमो यांनी त्यांच्या पतीविरोधात जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.

अंगमो यांनी सांगितले की, २६ सप्टेंबर रोजी लेह येथील पोलीस निरीक्षक रिगझीन गुरमेत (Rigzin Gurmet) यांनी त्यांना सांगितले की, वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (NSA) कलम ३(२) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केली जात आहे. त्या म्हणाल्या की त्यांना सांगण्यात आले की वांगचुक यांच्याबरोबर जोधपूर येथे जात असलेले एएसपी रिषभ शुक्ला हे तेथे उतरल्यावर त्यांचे बोलणे करवून देतील. “त्यांनी असेही सांगितले की ही अटक नाही कारण एफआयआर दाखल झालेला नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेण्यात आले आहे,” असेही अंगमो यांनी सांगितले.

मात्र त्या अधिकाऱ्याने अजूनही फोन केलेला नाही किंवा बोलणे करवून दिलेले नाही असे अंगमो म्हणाल्या. तसेच त्यांना सांगण्यात आले होते की अधिकारी त्यांना त्यांचे कायदेसीर हक्क सांगतील मात्र ते देखील करण्यात आलेले नाही, असा दावा अंगमो यांनी केला आहे.

इतकेच नाही तर अंगमो यांनी असाही दावा केला की, त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटिव्हज (HIAL) ही संस्था असलेल्या ठिकाणी, म्हणजेच फ्यांग (Phyang) गावात, त्यांच्यावर सीआरपीएफ (CRPF) कडून पाळत ठेवली जात आहे. तसेच गेल्या तीन दिवसांत कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय इंस्टिट्यूटच्या दोन सदस्यांना पोलिसांनी कोठडीत पाठण्यात आले, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

माझ्या पतीचा आणि ते ज्या उद्दिष्टे आणि तत्त्वांसाठी लढत आहेत त्या सर्वांचा आत्मा मारण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक बदनामी मोहीम राबली जात आहे आणि ती गेल्या चार वर्षांपासून गुप्त पद्धतीने सुरू होती, असे अंगमो यांनी पत्रात म्हटले आहे.

वांगचुक यांच्या पत्नीने राष्ट्रपती मुर्मू यांना प्रश्न विचारला आहे, त्या म्हणाल्या की, “हवामान बदल, वितळत असलेले हिमनग, शैक्षणिक सुधारणा आणि ग्रासरूट इनोव्हेशन याबद्दल बोलणे हा गुन्हा आहे का? गेली चार वर्षे शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या एका मागास आदिवासी भागाच्या प्रगतीसाठी आवाज उंचावणे गुन्हा आहे का? याला नक्कीच राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणता येणार नाही.”

वांगचुक यांच्या पत्नी राष्ट्रपतींना उद्देशून पुढे म्हणाल्या की, “महामहिम, तुम्ही स्वतः आदिवासी समाज/पार्श्वभूमीतून येत असल्यामुळे, लेह-लडाखच्या लोकांच्या भावना इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे समजू शकता.” तसेच अंगमो यांनी पुढे राष्ट्रपती मुर्मू यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.