नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत ‘‘मीच पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे, प्रसारमाध्यमांद्वारे माझ्याशी संवाद साधण्याची गरज नाही, मतभेद असतील तर ते थेट मला सांगा,’’ अशा स्पष्ट शब्दांत बंडखोरांना खडसावले. 

काँग्रेसने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकल्याने किमान वर्षभर तरी सोनिया याच पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्ष असतील, हे स्पष्ट झाले. सुमारे दीड वर्षांनंतर प्रत्यक्ष झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याचा आग्रह सदस्यांनी केला मात्र त्यावर ‘‘आपण विचार करू’’, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. सोनियांनी मात्र, सध्या तरी मीच पक्षाची स्थायी आणि निर्णायक अध्यक्ष असून पक्षांतर्गत मतभेद थेट मला सांगावेत, प्रसारमाध्यमांची मदत घेऊ नका, असे कथित ‘जी-२३’ बंडखोर गटातील नेत्यांना सुनावले. 

काँग्रेस बंडखोर नेत्यांच्या ‘जी-२३’ गटाचे नेते कपिल सिबल यांनी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याची टीका केली होती. पण, पक्षांतर्गत निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याद्वारे बंडखोर नेत्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवा पक्षाध्यक्ष ऑक्टोबर २०२२मध्ये निवडला जाईल. काँग्रेसच्या मुख्यालयात शनिवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीला ४५ सदस्य उपस्थित होते. त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्या आजारी असूनही २४ तास काम करत आहेत. पुढील वर्षी पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत सोनियाच पक्षाचे नेतृत्व करतील, असे स्पष्ट करत संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या ‘जी-२३’ गटातील नेत्यांनीही पक्षाच्या निर्णयाला सहमती दिल्याचे सूचित केले.

बैठकीच्या सुरुवातीलाच सोनियांनी बंडखोर नेत्यांना स्पष्ट शब्दांत समज दिली. संपूर्ण पक्षसंघटनेला काँग्रेसने पुन्हा मजबूत व्हावे असे वाटते. पण, त्यासाठी पक्षांतर्गत ऐक्य हवे. पक्षाच्या हितांना प्राधान्य दिले पाहिजे. पण, त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे संयम आणि शिस्त, असे सोनिया म्हणाल्या. स्पष्टपणे मत व्यक्त करण्याला माझा विरोध नाही. पण, प्रसारमाध्यमांचा आधार घेऊन मते मांडण्याची गरज नाही. म्हणून या बैठकीत मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करू. इथे झालेली चर्चा या खोलीबाहेर जाऊ  नये, कार्यकारिणीचा निर्णय सामूहिक असेल, असे सोनियांनी स्पष्ट केले. 

केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी मोहीम राबवणे, चीनच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला जाब विचारणे, इंधन दरवाढ आणि महागाई मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे असे तीन ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आले.

जनसामान्यांच्या प्रश्नांकडे काँग्रेस कधीही दुर्लक्ष करत नाही. या विषयांवर मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहे. समविचारी पक्षांशीही संवाद साधत असल्याचे सांगत सोनिया यांनी, काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन केले.

सहा महिन्यांत पक्ष गतिमान होणार?

काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीचा मुद्दा सातत्याने बंडखोर गटाने मांडला होता, त्याचे पडसाद कार्यकारी समितीच्या बैठकीत उमटले. पक्षाला तळागाळात पोहोचवण्यासाठी पक्षबांधणीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या धोरणांविरोधात संघर्ष करेल, त्यासाठी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वाना प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना राजकीय शिक्षणही दिले जाईल. देशभर व्यापक जनजागृती मोहीम आखली जाईल आणि पक्ष पुढील ६ ते ८ महिन्यांमध्ये गतिमान होईल, अशी माहिती वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

पक्ष मजबुतीसाठी १ नोव्हेंबर ते ३० मार्च २०२२ या पाच महिन्यांमध्ये सदस्यनोंदणी मोहीम राबवली जाईल. त्यानंतर १६ एप्रिल ते ३० मे या काळात बूथ स्तरावरील निवडणुका होतील. जून-जुलैमध्ये जिल्हाप्रमुख, उपप्रमुख आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची निवड होईल. २१ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ या महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य निवडले जातील, अशी माहिती प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

सरकारी अहंकारामुळेच हिंसाचार

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवरील हल्ला हा केंद्र सरकारच्या सततच्या अहंकाराची परिणती असल्याची टीका काँग्रेसने केली. लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झाली, परंतु मंत्र्याला पदावरून हटवण्यात न आल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

ही तर परिवार बचाव बैठक : भाजप

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीवर भाजपने, ‘परिवार बचाव कार्य समिती बैठक’ अशा शब्दांत टीका केली आहे. पक्षांतर्गत वाद आणि पक्षनेतृत्वाचे अपयश या प्रश्नांवर काही उत्तर शोधण्याऐवजी या बैठकीत खोटय़ाचा प्रचार करण्यात आला, असा टोला भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी लगावला.

पक्षाध्यक्ष निवड वर्षभर लांबणीवर

पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान होईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावून नवी कार्यकारिणी निवडली जाईल, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. याआधीही काँग्रेसने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून गेल्या जूनमध्ये पक्षाध्यक्षाची निवड करण्याचे निश्चित केले होते, मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक लांबणीवर पडण्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुन्हा राहुलच अध्यक्ष?

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घ्यावीत, अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेसमधील तरुण पिढीसाठी तेच सर्वोच्च नेते आहेत. राष्ट्रीय नेता बनवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतही ते सहभागी होतात पण, अंतिम निर्णय सोनियांचा असतो, असे वेणुगोपाल म्हणाले.