काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००७मध्ये दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांची अल्पकाळ सदिच्छा भेट घेतली असता, त्या भेटीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या आठवणी निघून मंडेला आणि सोनिया यांच्या भेटीला एक भावनिक उजाळा मिळाला. इंदिरा गांधी आणि राजीव यांचे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवर एक ऋण असल्याचे मंडेला यांच्या निकटवर्तीयांनी सोनियांना त्या वेळी सांगितले होते.
दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा देताना तब्बल २६ वर्षे तुरुंगवास भोगणारे भारतीय वंशाचे ज्येष्ठ नागरिक अहमद कथ्रादा यांनी त्या वेळी मंडेला आणि सोनिया यांची भेट घालून दिली होती. कथ्रादा हेही मंडेला यांच्याच समवेत तुरुंगवासात होते. वर्णद्वेषी सरकारविरोधात लढा देण्याकामी गांधी परिवार तसेच भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे कथ्रादा यांनी सांगितले. वर्णद्वेषाविरोधातील लढय़ासह आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे दिल्लीत कार्यालय सुरू करण्याकामीही इंदिराजींनी मदत केली होती तसेच आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला राजनैतिक दर्जा बहाल करून मान्यता देणारा भारत हा पहिला देश ठरला होता, अशीही माहिती कथ्रादा यांनी दिली. मंडेला यांना मदत करण्यासाठी इंदिराजी व माझ्या पतींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, याची आठवण करून देण्यात आल्यानंतर मंडेला यांच्यासमवेत काही काळ व्यतित करण्याची बाब आपल्याला हलविणारी ठरली, असे सोनिया गांधी यांनी सांगितले होते.