Vote Chori Allegations On Sonia Gandhi: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपालाही लक्ष्य केले होते. आता भाजपाने काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. भाजपाने आरोप केला आहे की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव ४५ वर्षांपूर्वी, भारतीय नागरिक होण्यापूर्वीच, बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

या मुद्द्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे, तर दुसरीकडे खासदार अनुराग ठाकूर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले.

गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनुराग ठाकूर म्हणाले की, “इंदिरा गांधी म्हणायच्या की, मतदार मूर्खांचा समूह असतात. राजीव गांधी निवडणूक हरले तेव्हा त्यांनी मतपत्रिकेला दोष दिला. ते म्हणायचे की निवडणुका ईव्हीएमवर घ्याव्यात आणि आता राहुल गांधी म्हणतात की निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. हे लोक दुसऱ्यांवर आरोप करत राहतात, म्हणून आता कुटुंबानेच ठरवावे की कोणाला काय हवे आहे.”

…तेव्हा भारताचे नागरिकत्व नव्हते

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स वरील पोस्टमध्ये आरोप केला आहे की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते.

अमित मालवीय म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याचे स्पष्ट उल्लंघनाचे उदाहरण आहे आणि कदाचित हेच कारण आहे की राहुल गांधी देखील अपात्र किंवा बेकायदेशीर मतदारांना कायदेशीर करण्याच्या बाजूने आहेत आणि “स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन”ला विरोध करत आहेत.

त्यावेळी त्या इटालियन नागरिक होत्या

मालवीय यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० मध्ये मतदार यादीत नोंदवले गेले होते, त्यावेळी त्या इटालियन नागरिक होत्या आणि त्यांना अद्याप भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अधिकृत निवासस्थान १, सफदरजंग रोड येथे राहत होते.”

अमित मालवीय पुढे म्हणाले की, “त्यावेळी या पत्त्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मनेका गांधी यांची नावे मतदार म्हणून होती, परंतु १९८० मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाची मतदार यादी सुधारित करण्यात आली ज्यामध्ये १ जानेवारी १९८० ही ‘पात्रता तारीख’ म्हणून दाखवण्यात आली आणि मतदान केंद्र १४५ मध्ये अनुक्रमांक ३८८ वर सोनिया गांधी यांचे नाव जोडण्यात आले.”