एक लाख ८७ हजार कोटींचा कथित कोळसा खाणवाटप घोटाळा आणि टू जी घोटाळ्यावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करीत मंगळवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. मात्र, भाजपच्या मागणीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तेवढय़ाच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. ‘भाजपने पंतप्रधानांचा राजीनामा मागत राहावे,’ अशा शब्दात त्यांनी भाजपची मागणी धुडकावून लावली. सोनिया गांधींचे हे उत्तर अहंकारी स्वरूपाचे असल्याची टीका भाजपने केली असून, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष त्यामुळे आणखी तीव्र झाला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचा दुसरा दिवसही विरोधकांच्या गोंधळामुळे वाया गेला. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच भाजप सदस्यांनी मध्यभागी येऊन ‘प्रधानमंत्री इस्तिफा दो’च्या घोषणा देत गोंधळ घातला. त्यात समाजवादी पक्ष, द्रमुक पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळाचा भर पडला. परिणामी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले, तर दोन वेळच्या स्थगितीनंतर राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या तीन आठवडय़ांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचा वापर मनमोहन सिंग सरकारला धारेवर धरण्यासाठी करण्यावर भाजपने भर दिला आहे. कोळसा खाणवाटप घोटाळा आणि पावणेदोन लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासाठी े पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लक्ष्य करण्याचे आक्रमक डावपेच मंगळवारी सकाळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आणि त्याचे पडसाद लगेचच दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.
कोळसा खाणवाटप घोटाळ्यात काँग्रेसशिवाय यूपीएच्या कोणत्याही घटक पक्षाचा हात नाही. कोळसा खाणवाटप घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा सहभाग स्पष्ट आहे, असा आरोप भाजपनेते रविशंकर प्रसाद यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2013 रोजी प्रकाशित
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी सोनियांनी धुडकावली
एक लाख ८७ हजार कोटींचा कथित कोळसा खाणवाटप घोटाळा आणि टू जी घोटाळ्यावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करीत मंगळवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले.
First published on: 24-04-2013 at 05:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soniya rejects the demand of resignation demand of pm