एपी, सेऊल
जॉर्जिया येथील ह्युंदाई कंपनीच्या कारखान्यात अमेरिकेच्या स्थलांतरित विभागाने घातलेल्या छाप्यात दक्षिण कोरियाच्या तीनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील करारानंतर या कर्मचाऱ्यांची सुटका केली जाणार असल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे अध्यक्षीय प्रमुख हून सिक यांनी सांगितले, की दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी अंतिम बोलणी झाली आहेत. कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी दक्षिण कोरिया विमान पाठविणार आहे. कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रशासन आवश्यक ती पावले तातडीने उचलेल.
अमेरिकेच्या स्थलांतरित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांनी ४७५ हून अधिक दक्षिण कोरियाच्या नागरिकांना ह्युंदाई कंपनीच्या आवारात पकडले. या ठिकाणी ह्युंदाई कंपनी त्यांच्या कार तयार करते. दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो ह्यून यांनी नंतर तीनशेहून अधिक दक्षिण कोरियाचे नागरिक असल्याची माहिती दिली.
‘ह्युंदाई’ कंपनीवर छापा टाकणे, हे बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशांत परत पाठविण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचा हा एक भाग आहे. मात्र, गेल्या आठवड्यात केलेली ही कारवाई सर्वांत मोठी होती. जॉर्जियामधील सर्वांत मोठ्या उत्पादन प्रकल्पावर हा छापा होता.