पीटीआय, नवी दिल्ली/बंगळूरु : कर्नाटकमध्ये काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तिघांची निरीक्षक म्हणून रविवारी नियुक्ती केली. बंगळूरुमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षकांनी आमदारांच्या भावना जाणून घेतल्या. त्याआधारे मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा मिळवून बहुमत प्रस्थापित केले आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. शिंदे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र सिंह आणि अ.भा. काँग्रेसचे माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी केली. सिद्दरामय्या आणि शिवकुमार (६०) या दोघांनीही निष्ठावंत आमदारांसोबत बैठका घेऊन आपली तटबंदी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.

शिवकुमार यांचे सूचक भाष्य

निवडणुकीत आपण सर्वाना सोबत घेतले आणि स्वत:साठी कधीही काहीच मागितले नाही, असे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील तुमकुरु येथे आले असता ‘ज्यांना लोकांची पसंती आहे त्यांना की ज्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले अशांना प्राधान्य द्यायला हवे,’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ‘२०१९ साली काँग्रेसचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाने माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. खोटय़ा प्रकरणात मला तुरुंगात पाठविले असताना सोनिया गांधी आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या’, असे उत्तर त्यांनी दिले. सिद्धरामय्या यांच्यासोबत मतभेद असल्याचा इन्कार करतानाच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि विधिमंडळ पक्ष घेईल, असे शिवकुमार म्हणाले.

समर्थकांचे ‘फलकयुद्ध’

पक्षात मुख्यमंत्री निवडीसाठी खलबते सुरू असतानाच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये फलकयुद्ध रंगल्याचे बघायला मिळाले. राजधानी बंगळूरुसह अन्य शहरांमध्ये दोघांनाही मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. शिवकुमार यांच्या घराबाहेर लागलेल्या पोस्टरमध्ये ‘नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा मजकूर आहे. तर सिद्धरामय्या यांच्या घरासमोरही ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले पोस्टर लावण्यात आले आहे.

पक्षाचे निरीक्षक आमदारांच्या भावना जाणून घेतील आणि पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालतील. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल. सर्वकाही व्यवस्थित सुरू असून कर्नाटकात काँग्रेसचे सरकार लवकरच स्थापन होईल.

– मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस