यूपीएच्या काळात पंतप्रधानपदाला कणाच राहिला नाही – भाजपची टीका

यूपीए सरकारच्या काळात देशाला पंतप्रधान आहे. मात्र, खंबीर नेतृत्त्व नाही. पंतप्रधानपदाला कणाच राहिलेला नाही, या शब्दांत भारतीय जनता पक्षाने बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली.

यूपीए सरकारच्या काळात देशाला पंतप्रधान आहे. मात्र, खंबीर नेतृत्त्व नाही. पंतप्रधानपदाला कणाच राहिलेला नाही, या शब्दांत भारतीय जनता पक्षाने बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली. यूपीए सरकार आपल्या कार्यकाळाची चार वर्षे बुधवारी पूर्ण करणार आहे. सरकारचे रिपोर्ट कार्ड बुधवारी दिल्लीमध्ये मांडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन यूपीए सरकारवर टीका केली. सरकारविरोधात पक्ष पुढील आठवड्यापासून जेलभरो आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारने स्वतःच्याच भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड तोडले असल्याची टीका सुषमा स्वराज यांनी केली. त्या म्हणाल्या, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशाला प्रगतीपथावर नेले होते. यूपीएमधील घटक पक्ष कोणत्याही निर्णयासाठी पंतप्रधानांकडे न जाता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे जातात. सोनिया गांधींच्या हस्तक्षेपामुळेच सरकारमध्ये निर्नायकी अवस्था निर्माण झालीये.
जेटली म्हणाले, यूपीए सरकार आणि कॉंग्रेसची लोकप्रियता वेगाने कमी होते आहे. पुढल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही घसरण कुठपर्यंत पोहोचेल, याची कल्पनाही करता येणार नाही. सरकारला अहंकार झाला असून, ते स्वतःच्या अहंकारात मश्गूल आहे. माध्यमांमध्येही सरकारच्या धोरण लकव्याबद्दल सातत्याने छापून येते आहे.
यूपीए सरकारने गेल्या चार वर्षांत जर कोणते काम केले असेल, तर ते फक्त सीबीआयचा दुरूपयोग करण्याचेच काम केलंय. सीबीआयच्या स्वायत्ततेसाठी संसदेच्या समितीने सविस्तर अहवाल दिलेला असतानाच केवळ दाखवण्यासाठी उगाचच वेगळ्या मंत्रिगटाची निर्मिती करण्यात आली. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचा समारंभ कसला करता. वास्तविक समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने संसदेमध्ये सरकारला वाचवले नसते, तर बरंच झाले असते, असेही जेटली म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Split leadership biggest failure of upa says bjp leader sushma swaraj