Ranil Wickremesinghe resigns : मागील काही काळापासून श्रीलंका आर्थिक संकटाला सामोरं जात आहेत. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलनं करत आहेत. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही आंदोलक मागे हटले नाहीत.

यानंतर आता श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वी त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांशी बातचित करून पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता श्रीलंकेतील संघर्षाला वेगळं वळण मिळालं आहे.

खरंतर, श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे. श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या सोळा सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली आहे. यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीनंतर विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे.