श्रीलंकेच्या उत्तरेकडील तामिळींचे प्राबल्य असलेल्या प्रांतात गेल्या २५ वर्षांत प्रथमच झालेल्या निवडणुकीत जवळपास ६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. लष्कराने लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा (एलटीटीई) पराभव करून वांशिक तिढा सोडविल्यानंतर चार वर्षांनी या निवडणुका झाल्या.
शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त हाती आले नसून निकाल रविवारी अपेक्षित आहे. या प्रांतातील पाच जिल्ह्य़ांमधील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी ४७८ मतमोजणी केंद्रांवर मोजणीला सुरुवात झाल्याचेही अधिकारी म्हणाले.निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. तामिळींचे प्राबल्य असलेल्या प्रांतातील मतदारांना विकासाच्या अधिक संधी हव्या आहेत की जनतेला अधिक स्वायत्तता हवी आहे, याची चाचणी या निवडणुकांमुळे होणार आहे.
जवळपास एक दशक सुरू असलेल्या वांशिक तिढय़ानंतर अल्पसंख्य तामिळींना स्वयंकारभाराची संधी देणाऱ्या या निवडणुका आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रमुख तामिळ पक्ष असलेल्या तामिळ नॅशनल अलायन्सला (टीएनए) उत्तरेकडील प्रांतात,  विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.