श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून नागरिकांमधील रोष वाढत चालला आहे. हिंसक निदर्शनांमुळे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांना गुरुवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली. दरम्यान देशात सुरु असलेलं आंदोलन हिंसक होत चालल्याचं दिसत आहे. प्रशासनाने कारवाई करताना आतापर्यंत अनेकांना अटक केली असून कर्फ्यूदेखील लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी विक्रमसिंघे

यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोठ्या संख्येने लोक एका कारच्या भोवती जमा झालेले दिसत असून नंतर ही कार तलावात ढकलून देतात. ही कार एका माजी मंत्र्याची आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक असल्याने काही वेळाने ही कार तलावात पडताना व्हिडीओत दिसत आहे.

या व्हिडीओत एक व्यक्ती गॅस, इंधन, जीवनाश्यक वस्तू नसल्याची तक्रार करत संताप व्यक्त करताना दिसत आहे. तसंच लोकांचे हाल होत असून एक वेळच्या जेवणावरच जगत असल्याचंही सांगताना दिसत आहे.

१९४८ला स्वतंत्र झाल्यापासून श्रीलंकेत प्रथमच एवढे मोठे आर्थिक संकट उद्भवले आहे. परकीय गंगाजळीच्या खडखडाटामुळे श्रीलंकेला अत्यावश्यक अन्नधान्य, इंधन आयात करणे परवडत नाही. त्यामुळे त्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दर गगनाला भिडले आहेत.

वीजेचं संकट आणि अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मार्च महिन्यात लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली होती. अध्यक्ष गोताबया आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी ९ एप्रिलपासून देशभर हिंसक निदर्शने होत होती. देशात औषधे, इंधन आणि विजेचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे राजपक्षे सरकारविरुद्ध तीव्र रोष होता. मात्र अध्यक्ष आणि पंतप्रधान राजपक्षे बंधूंनी राजीनामा देण्याचे टाळले होते. या दोघांनीही जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले होते. मात्र म्याना गो गामा आणि गोता गो गामा या भागांत सरकारसमर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये हिंसाचार उसळला. त्यात १३० जण जखमी झाले. यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर राजीनामा दिला.

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी विक्रमसिंघे

विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांना गुरुवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली. युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) नेते असलेले ७३ वर्षांचे विक्रमसिंघे यांच्याशी बुधवारी बंदद्वार चर्चा केल्यानंतर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी त्यांची या पदावर नेमणूक केली.

यापूर्वी चार वेळा देशाचे पंतप्रधानपद म्हणून काम पाहिलेले विक्रमसिंघे यांना तत्कालीन अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये पदावरून हटवले होते. तथापि, त्यानंतर दोनच महिन्यांनी सिरिसेना यांना त्या पदावर पुनस्र्थापित केले. विक्रमसिंघे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी श्रीलंका पोदुजना पेरामुना (एसएलपीपी), समागी जना बलवेगया (एसजेबी) या मुख्य विरोधी पक्षाचा एक गट आणि इतर अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lankans push car of former minister into lake sgy
First published on: 13-05-2022 at 14:08 IST