बिहारमधील बहुचर्चित सृजन घोटाळ्याचे लोण उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीपर्यंत पोहोचले आहे. आयकर विभागाच्या पथकाने गुरूवारी पाटणा येथे याप्रकरणी छापा टाकला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी याचवर्षी सुशीलकुमार मोदी यांची बहीण आणि भाचीवर घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाटणा येथील रेखा मोदी यांच्या घर गेले आहेत. यावेळी पाटणा पोलीसही घटनास्थळी उपस्थित होती. त्यांच्या घरातून काय जप्त करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची बहीण रेखा मोदी आणि त्यांची भाची उर्वशी मोदी यांनी सृजनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप २८ जून २०१८ ला आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत केला होता. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी बँकेचे स्टेटमेंटही जोडले होते. सुशीलकुमार मोदी आणि नितीशकुमार २५०० कोटींच्या घोटाळ्यासाठी थेट जबाबदार आहेत. पण सीबीआय याप्रकरणी त्यांचे नावही घेत नाही आणि त्यांची चौकशीही करत नाही, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला होता.

काय आहे सृजन घोटाळा

सृजन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना मनोरमा देवी यांनी केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आणि त्याची पत्नी ती संस्था चालवत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या बँक खात्यात ठेवण्यात आलेला सरकारी पैसा सृजन संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता. अनेक सरकारी विभागातील रक्कम थेट विभागीय खात्यात न जाता ती थेट सृजन महिला विकास सहयोग समितीच्या सहा खात्यात हस्तांतरित होत. १३ ऑगस्ट २०१७ मध्ये नितीशकुमार यांनी सृजन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srijan scam case income tax department raids bihar deputy cm sushil modis sister rekha in patna
First published on: 06-09-2018 at 16:10 IST