श्रीनगर – मुझफ्फराबाद यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून होणारा व्यापार बुधवारी पुन्हा सुरू करण्यात आला़  गेल्या सुमारे पाच आठवडय़ांपासून या मार्गावरून व्यापार ठप्प होता़  काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यातील या मार्गाचा वापर करण्याबाबत सोमवारी द्विपक्षीयांमध्ये करार करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली़
२२ मालवाहक ट्रक बुधवारी सकाळी काश्मीरच्या या भागातील सलामाबाद येथून पाकव्याप्त काश्मीरकडे रवाना करण्यात आल्याचेही संबंधितांनी सांगितल़े  १७ जानेवारी रोजी ब्राऊन शुगरची ११४ पाकिटे ट्रकमध्ये सापडल्यामुळे हा व्यापार आणि श्रीनगर – मुझफ्फराबाद मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़  या प्रकरणात पाकच्या ट्रक चालकालाही अटक करण्यात आली होती़  अखेर द्विपक्षीय तोडगा काढत, बुधवारी व्यापार पुन्हा सुरू करण्यात आला़