Foreign Secretary Vikram Misri: ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळांचा मारा केला. या हल्ल्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक लष्करी अधिकारी शहीद झाला. तसेच पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळे भारताने जोरदार प्रत्युत्तर देत लाहोरमधील रडार डिफेन्स सिस्टिम ड्रोनद्वारे उध्वस्त केली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी आज घडलेल्या घडामोडींवर पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये सामान्य नागरिक मारले गेल्याचा दावा फोल
भारताने ७ मे रोजी राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे सामान्य नागरिक मारले गेले, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. पण दाव्यातील फोलपणा भारताने उघडा पाडला आहे. विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचा सबळ पुरावा दाखवला. ऑपरेशन सिंदूरमुळे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचे भारताने म्हटले होते. मृत दहशतवाद्यांवर पाकिस्तानने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केल्याचे फोटो विक्रम मिस्री यांनी दाखवले आहेत.
दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देण्याची पाकिस्तानमध्ये पद्धत असावी, अशी टीका यावेळी विक्रम मिस्री यांनी केली. त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या फोटोमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकारातून पाकिस्तानला कोणता संदेश द्यायचा आहे? असा सवाल विक्रम मिस्री यांनी उपस्थित केला. या फोटोमध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादीही प्रार्थना करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.
विक्रम मिस्री पुढे म्हणाले, जर भारताच्या हल्ल्यात सामान्य नागरिक मारले गेले असते, तर मग सामान्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानी ध्वजात लपेटून केले जातात का? जर शासकीय इतमामात सामान्य नागरिकांचे अंत्यसंस्कार होत असतील तर हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
विक्रम मिस्री यांनी यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नुकत्याच केलेल्या विधानाचा हवाला दिला. पाकिस्तानने गतकाळात दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम केले होते. आता त्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे, असे दोघेही म्हणाले होते. अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला होता, याही विधानाचा दाखला विक्रम मिस्री यांनी दिला.