न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागत आहे. रस्त्यांना नद्यांच्या स्वरूप प्राप्त झालं आहे. भयावह स्थिती पाहता न्यूयॉर्केचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली आहे. ट्वीट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांना अत्यावश्यक तेव्हाच घराबाहेर पडा, अशा सूचन केल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकरची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गेल्या एका तासात ३ इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. त्यामुळे स्थिती विदारक असल्याची जाणीव होत आहे. न्यूयॉर्क शहरातील लागुआर्डिया आणि जेएफके विमानतळावरील विमानसेवाही विस्कळीत झाली आहे.

“न्यूयॉर्कमधील पूरस्थिती पाहता मी आज रात्रीसाठी शहरात आणीबाणी घोषित करत आहे. गेल्या तासात शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. जवळपास ५,३०० ग्राहकांना सध्याच्या स्थितीत वीज पुरवठा होत नाही. पुढील काही तासात पाऊस थांबेल अशी आशा आहे. घरीच थांबा.”, असं आवाहन न्यूयॉर्कचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी केलं आहे.

न्यूयॉर्कमधील स्थिती पाहता अग्निशमन दल आणि बचाव पथक सज्ज झालं आहे. येणाऱ्या प्रत्येक कॉलला उत्तर दिलं जात असल्याचं अग्निशमन दल विभागाचे प्रवक्त्यांनी सांगितलं.

न्यूयॉर्कसारखीच परिस्थिती न्यूजर्सीमध्येही आहे. त्यामुळे तिथेही आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. न्यूजर्सीमध्ये मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.