इंडोनेशियाला मंगळवारी भूकंपाच्या जोरदार तडाख्यांनी हादरविले. ६.१ रिश्टर स्केल या तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशियाच्या उत्तरेकडील भागात इमारतींची मोठय़ा प्रमाणात पडझड होऊन सुमारे ५०जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या तडाख्याने त्सुनामीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार,बैरूनच्या दक्षिणेस ५५ कि.मी. अंतराव आणि १० कि.मी. भूगर्भात सकाळी ७.३७च्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला.
या भूकंपात अनेक भागांत इमारती कोसळल्यामुळे सुमारे ५० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती लंपाहन शहराच्या वैद्यकीय विभागाच्या डॉ. इमा सुर्यानी यांनी दिली.
सुमारे एक मिनिट जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्य़ांनी घरांची पडझड होऊ लागल्यामुळे नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले. मात्र या भूकंपामुळे  जीवितहानी वा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, २००४ मध्ये इंडोनेशियाला भूकंपाच्या धक्क्य़ानंतर आलेल्या त्सुनामीने झोडपून काढले होते. या दुर्घटनेत सुमात्रा बेटांवरील १ लाख ७० हजार नागरिकांचा बळी गेला होता, तर हिंदू महासागर परिसरातील अनेक राष्ट्रांमध्येही मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong earthquake in indonesia 50 injured
First published on: 02-07-2013 at 06:17 IST