हैदराबाद विद्यापीठातील एमएफएच्या पहिल्या सत्राच्या विद्यार्थ्यांने पहाटेच्या वेळी आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. डिपार्टमेंट ऑफ फाइन आर्ट्सच्या नेल्ली प्रवीण कुमार या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली तो या विभागाच्या सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन संस्थेचा विद्यार्थी होता. त्याने वसतिगृहात टांगून घेऊन आत्महत्या केली, असे पोलीस सहआयुक्त एम. स्टीफन रवींद्र यांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, कारण त्याच्याजवळ कुठलीही चिठ्ठी सापडली नाही. काही विद्यार्थ्यांनी त्याला रुग्णालयात नेले होते, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हैदराबाद विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले, की सकाळी सव्वाचार वाजता प्रवीणचा सहकारी पेंटिंग स्टुडिओतून परत आला व त्याला खोलीचे लॅच आतून लावलेले दिसले. जेव्हा प्रवीणने दरवाजा उघडला नाही तेव्हा त्या विद्यार्थ्यांने इतर विद्यार्थ्यांना सतर्क केले. त्यांनी नंतर लॅच उघडले असता प्रवीण कुमार हा छताला फाशी घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याला विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात नेण्यात येऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. नंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचा भाऊ रुग्णालयात आला होता व नंतर प्रवीणचा मृतदेह उस्मानिया सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण हा तेलंगणातील महबूबनगरचा होता. त्याच्या आईवडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली. प्रकुलगुरू विपीन श्रीवास्तव यांनी सांगितले, की प्रवीण याने एमएफए अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता.

पोलीस तपास चालू असून विद्यापीठ अधिकारी व प्राध्यापक त्याच्या मित्र व कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. विद्यापीठाने कुमार याच्या अकाली निधनाबाबत दु:ख व्यक्त केले होते. पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याने वसतिगृहाच्या खोलीत १७ जानेवारीला आत्महत्या केली होती. त्याला विद्यापीठाने ऑगस्ट महिन्यात अभाविप नेत्यावर हल्लाप्रकरणी निलंबित केले होते. नंतर त्याचे निलंबन मागेही घेतले होते. रोहित वेमुलाच्या आत्महत्येने राजकीय वाद निर्माण झाला होता. दलित विद्यार्थ्यांबाबत केंद्रीय मंत्री बंदारू दत्तात्रेय यांच्या हस्तक्षेपावरून अन्याय करण्यात आला, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी अडचणीत आल्या होत्या.